लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शाळकरी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह आहारात आता तृणधान्याचा वापर केला जाईल. त्यासाठी आहार पुरवणाऱ्या स्वयंसाहाय्य गटांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. यावेळी त्यांनी वीज दरवाढीचे समर्थन करताना तामनार प्रकल्पाचे येत्या ऑक्टोबरपर्यंत उद्घाटन करण्यात येईल, असेही सांगितले.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, युनिटमागे केवळ ६० ते १० पैसेच वीज दरवाढ केलेली आहे. तशी एकूण बिलांत ८ ते १० रुपयांची वाढ होणार आहे. ही वाढ तशी सर्वसामान्य जनतेसाठी मोठी नव्हे. तसेच वीज दरवाढ संयुक्त वीज नियामक आयोग ठरवतो, सरकार नव्हे. ही दरवाढ केली नाही तर केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार नाही. दरवाढ न करता राज्य सरकार अनुदान देत राहिले तर केंद्र काहीच देणार नाही. घरगुती वापराच्या विजेसाठी ही दरवाढ तशी मोठी नाही. काही प्रमाणात व्यावसायिक आस्थापनांना झळ बसेल. सरकारने गेल्या पाच वर्षांत भूमिगत वीज वाहिन्या व इतर सुधारणांवर २ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. लोकांना वीज खंडित झाली तरीही ते चालत नाही. दर्जेदार वीज हवी असेल तर खर्चही करावा लागणार. त्यासाठी दरवाढ अटळ असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्र सरकारकडून २,५०० कोटी अनुदान मिळू शकते. दर न वाढवल्यास हा निधी मिळू शकणार नाही. आम्ही प्रस्ताव पाठवणार आहोत. राज्यात विजेच्या संदर्भात पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणखी ३ हजार कोटी रुपयांची गरज आहे. देशभरात घरांना भूमिगत केबल देणारे गोवा हे पहिले राज्य आहे. इतर राज्यांमध्ये कारखान्यांना भूमिगत केबलसाठी प्राधान्य दिले जाते. तसेच गोव्यात भारनियमन किंवा शटडाउन केले जात नाही. शेजारील राज्यात हा प्रकार चालतो. संपूर्ण दिवस वीज बंद असते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, तामनार प्रकल्पाला विरोध होत असतानाच सरकारची भूमिका आता अधिक स्पष्ट झाली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, अवघेच काही काम बाकी आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत उद्घाटन होईल.
...तर कंत्राटदारांना 'ते' काम पुन्हा करावे लागणार
स्मार्ट सिटीचे कोणतेही काम निकृष्ट दर्जाचे केलेले आढळून आल्यास कंत्राटदारांना ते पुन्हा करून देण्यास भाग पाडू, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला. पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर ते म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या कामाचा अहवाल तयार केला जाणार असून तो जाहीर करू, स्मार्ट सिटीची कामे लांबल्याने लोकांना जो त्रास झलेला आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली. राजधानी शहरात मलनि:स्सारणाची मोठी समस्या होती. आता वाहिन्या टाकल्याने ती दूर हाईल.
प्रशिक्षण देणार
उद्या, २१ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त तृणधान्य वापराचा प्रसार केला जाईल. महिला स्वयंसाहाय्य गटांना प्रशिक्षण देऊन आहारात तृणधान्य कसे वापरता येईल. कोणकोणते पदार्थ बनवता येतील, हे सांगितले जाईल. सध्या पावभाजी, उसळ आदी पदार्थ दिले जातात.