पणजी: रुग्णांच्या जेवणात आता यापुढे कृणधान्यांचा समावेश केला जाईल. आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी गोमेकॉत दाखल असलेल्या रुग्णांना कृणधान्यांचा समावेश असलेलेल्या पौष्टिक अन्न मिळावे या हेतूने हा उपक्रम सुरु केला आहे.
यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर , गोमेकॉचे डॉक्टर व अधिकारीवर्ग उपस्थित होते. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी स्वत: रुग्णांना या पौष्टिक अन्नाचा समावेश असलेल्या थाळीचे वाटप केले. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक आनंदी झाले. तसेच त्यांनी त्यासाठी आभारही मानले.
मंत्री राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिजन पुढे नेणे, रुग्णांना बाजरी, नाचणी यासारख्या कृणधान्यांचा समावेश असलेले पौष्टिक तसेच समृद्ध जेवण देणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. अत्याधुनिक वैद्यकीय उपचार रुग्णांना देण्याबरोबरच रुग्णांना पोषणयुक्त अन्न मिळावे, जेणे करुन त्यांची तब्येत वेगाने बरी व्हावी यासाठी कृणधान्यांचा आता त्यात समावेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.