पणजी - एटीएम चोरट्यांनी गोव्यात दहशत निर्माण केली असून आतापर्यंतच्या 13 प्रकरणात पोलिसांची खातीही साफ करण्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकरणाचा अभ्यासातून एक निष्कर्ष पोलिसांनी लावला आहे की हे हॅकर्स केवळ ठराविक एटीएम मशिन्स लक्ष्य करतात.
पणजीतच घडलेल्या दोन प्रकरणात आत्माराम बोरकर मार्गाजवळील पंजाब नॅशनल बँकच्या एटीएमलाच स्किमर्स लावण्यात आले होते. दोन्हीही विदेशी हॅकर्सकडूनच प्रयत्न झाले होते आणि दोन्हीवेळा त्यांचे डाव उधळले गेले होते. याप्रकरणी संशयित पकडले गेले होते. याच एटीएमला स्किमर्स लावण्यात का आलं याचे उत्तरही संशयिताकडूनच पोलिसांना मिळाले. ते एटीएम मशीन गजबजलेल्या ठिकाणी नसल्यामुळे आणि लोकांच्या रांगा लागत नसल्यामुळे स्किमर लावण्यासाठी चांगला वेळ मिळतो. तशेच मशिन अत्याधुनिक नसल्यामुळे स्किमर लावणे सोपे होते. पहिल्यांदा हे स्किमर पोलिसांनाही काढणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे स्वत: संशयितानेच काढून दिला होता.
दुसरी गोष्ट म्हणजे जे स्कीमर तयार केलेले असतात ते एटीएममशीनच्या एटीएम कार्ड स्क्रॅच करण्याच्या ब्लॉकमध्ये व्यवस्थित बसावे लागते. मशिन्सचा आकार जरा वेगळा असला तर ते लागत नाहीत. त्यामुळे ज्या एटीएममध्ये स्किमर लागतो असे चोरट्यांच्या लक्षात येते दुसऱ्यावेळी त्याच एटीएममध्ये ते जातात आणि पुन्हा स्किमर लावतात. स्कीमरचा रंग आणि एटीएमचा रंग हा एकसारखाच असला पाहिजे याची काळजी घेतली जाते. म्हणजेच हे रंग ज्या ठिकाणी जुळलेले असतात तीच एटीएम पुन्हा निवडणे त्यांच्यासाठी सोयीचे असते.
एटीएमला लावण्यात येणारे स्कीमर हे एटीएम कार्ड ज्या ठिकाणी स्क्रॅश केले जाते त्यालाच जोडले जाते. त्यामुळे स्क्रॅचरच्या आकारात गडबड दिसून आल्यास ते ओढून पाहण्याची खबरदारी लोकांनी घ्यावी अशी सूचना गोवा पोलिसांनी केली आहे. एटीएम क्रमांक पॅडच्यावर सक्ष्म कॅमरा लावला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे क्रमांक पॅड हाताने लपवून पीन कोड एन्टर करावा अशी सूचना करण्यात आली आहे. एटीएममध्ये स्कीमर लावलेले आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना दिल्यास एक हजार रुपये बक्षीस देण्याचे तसेच गुन्हेगाराला पकडल्यास ५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी केली आहे.
बँकांची उदासीनता मारक
हॅकर्स हे तंत्रज्ञानाच्या बाबतीत चार पावले पुढेही असले तरी अत्याधुनिक तंत्रज्ञान हाच या हॅकर्सच्या विरोधात एक नामी उपाय आहे. क्लोनिंगविरोधी एटीएम मशीन्स हॅक केले जाऊ शकत नसल्याचा तज्ञांचा दावा आहे आणि काही बँकांद्वारे तशी एटीएम्स सुरू करण्यातही आली आहेत व ती सुरक्षितही ठरली आहेत. सर्वच बँक या बाबतीत सकारात्मक असल्याचे दिसत नाही. त्याचे कारण म्हणजे एटीएमचा विमा असल्यामुळे एटीएम फोडली तरी त्यांना सोयर सुतक लागत नाही. त्यांचे पैसे त्यांना मिळतात. त्यामुळे आधुनिक एटीएम मशिन्स बसविण्यासाठी फार उत्सूकता दाखविली जात नाही. एवढेच नव्हे तर हॅकिंग सारखे प्रकार घडल्यावरही गुन्हा नोंदविण्यास किंवा पोलिसांना माहिती देण्यास बँकांकडून तत्परता दाखविली जात नाही.