असंवेदनशील सरकारला अद्दल घडवा; काँग्रेसची केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 12:24 PM2023-03-05T12:24:38+5:302023-03-05T12:26:34+5:30
केरी-तेरेखोल येथे हाथ जोडो अभियानाला प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क, हरमल: भाजप सरकारने त्रिपुरा व अन्य राज्यांचे निकाल झाल्यानंतर गॅस दरवाढ करून जनतेला किती किंमत असते, याची जाणीव करून दिली. भाजप म्हणजे "भ्रष्ट जुमला पार्टी' असून गोमंतकीयांचा विश्वासघात केला आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. केंद्र व राज्य सरकारने बेरोजगार युवकांची फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये स्वीकारून नोकऱ्या देत आहेत.
सामाजिक सुरक्षा योजनेसाठी पैसे नाहीत. मात्र इव्हेंट आयोजनासाठी तसेच ८ मिनिटांच्या शपथविधीसाठी ८ कोटी रुपये खर्च केले आहेत. जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या भाजपला घरी पाठवण्याची गरज आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी केली.
गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने राज्यात हाथ से हाथ जोडो अभियान सुरू केले असून, मांद्रे विधानसभाक्षेत्र एक व त्या मतदारसंघातील बूथ एक केरी तेरेखोल पंचायत क्षेत्रात सुरू . यावेळी गट अध्यक्ष नारायण रेडकर यांनी कार्यकर्त्यांना घेऊन सभा घेतल्याबद्दल वक्त्यांनी रेडकर यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार अॅड. कार्लुस फेरेरा, रमाकांत खलप, बाबी बागकर, प्रदीप देसाई, नारायण रेडकर, रामचंद्र केरकर, तेरेखोल पंचसदस्य गुदिन्हो व इतर मान्यवर उपस्थित होते.
मतभेद विसरून सरकारला सत्ताभ्रष्ट करा: युरी
भाजपने देशात व राज्यात फोडाफोडीचे राजकारण व धर्मीयांत कटुता निर्माण केली. आज गोव्याचे भवितव्य तुमच्या हातात आहे. मतभेद विसरून भाजपला सत्ताभ्रष्ट करणे गरजेचे आहे. म्हादईप्रश्नी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. मात्र मुख्यमंत्री सावंत यांनी आमची मागणी धुडकावून लावली.
भाजप दादागिरी करीत असून विधानसभा अधिवेशन चार दिवसांचे केले. यावरून भाजप सरकार जनतेला घाबरत आहे. विरोधात असलेला काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेसाठी असून प्रत्येक प्रश्नावर आम्ही आवाज उठवू जनतेने साथ द्यावी, असे आवाहन आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.
खासदार फ्रान्सिस सार्दिन खासदारकीच्या काळात गोव्यात अनेक योजना व प्रकल्प साकारले, त्याचे श्रेय भाजप घेत आहे. म्हादईबाबत लोकसभा काळात आपण आवाज उठवणार असून भाजपच्या अविचारी कृत्याला जाब विचारण्याची ताकद काँग्रेस पक्षात असल्याचे सार्दिन यांनी सांगितले.
यावेळी अॅड. रमाकांत खलप यांनी तिळारी व म्हादईसाठी लढा उभारण्याची गरज व्यक्त केली. बाबी बागकर यांचेही समयोचित भाषण झाले. मांद्रे गट अध्यक्ष नारायण रेडकर यांनी स्वागत केले व हाथ से हाथ जोडो अभियानाला मतदारसंघातील मतदारांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. सूत्रनिवेदन युवा उत्तर गोवा काँग्रेसचे सरचिटणीस प्रणव परब यांनी केले तर जितेंद्र गांवकर यांनी आभार मानले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"