मडगाव: रेल्वे मार्ग रुंदीकरणाला होत असलेल्या विरोधाचा आता हळूहळू सासष्टीच्या सत्ताधारी भाजप आमदारांना बसू लागला असून कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्डना यांच्या पाठोपाठ आता कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस यांनीही आपण लोकांबरोबर असल्याचे जाहीर केले आहे.
नुवेचे आमदार बाबाशान डीसा यांनी रेल्वे मार्ग दुपदरीकरणाला यापूर्वीच विरोध केला असून सासष्टीचे एकमेव मंत्री असलेले वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रोड्रिग्स यांनी आता उघडरीत्या आंदोलनात उतरावे यासाठी स्थानिकाकाडून त्यांच्यावर दबाव येऊ लागला आहे.
शुक्रवारी आमदार डायस यांनी रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर लोकांची चांदर येथील आपल्या कार्यालयात बैठक बोलावली असता रेल्वे अधिकारी लोकांच्या प्रश्नाना समाधानकारक उत्तरे देऊ शकले नव्हते. रेल्वे मार्ग रुंदीकरणासाठी चांदर चर्चच्या मालकीची जमीन बळजबरीने रेल्वेने ताब्यात घेतली असून या जागेत 10 ट्रेक बसविण्यात येणार असल्याची स्थानिकामध्ये भावना तयार झाली आहे. नेमक्या याच शंकेचे रेल्वे विकास निगमचे सरव्यवस्थापक साहू हे समर्पक उत्तर देऊ शकले नसल्याने लोकांचे समाधान होऊ शकले नाही.
यानंतर प्रदारमध्यमांशी बोलताना आमदार डायस यांनी रेल्वे सर्व गोष्टी लपवून ठेवत असून त्यामुळे रेल्वे आणि सरकार यांच्यावरील लोकांचा विश्वास उडू लागला आहे असे वक्तव्य केले. चर्चची जमीन अधिग्रहणातून वगळावी यासाठी आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे बोलणार असे त्यांनी सांगितले. यापूर्वी चांदर येथे या मार्ग विस्ताराला विरोध करण्यासाठी लोक जमा झाले होते त्यावेळी स्वतः डायस हेही लोकांबरोबर आंदोलनात सामील झाले होते.
सांखवाळ येथे मार्ग विस्तार विरोधी आंदोलकांच्या सभेला कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्डना या स्वतः उपस्थित राहून त्यानी या रेल मार्ग विस्ताराला विरोध केला होता. हा प्रकल्प रद्द करावा अशी उघड मागणी त्यांनी यावेळी केली. यापूर्वी नुवेचे आमदार बाबाशान डीसा यांनी स्थानिक सरपंचांसह मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपला या प्रकल्पाला असलेला विरोध स्पष्ट केला होता.
मागच्या आठवड्यात या आंदोलनाची धग जलस्त्रोतमंत्री फिलिप नेरी रोड्रिग्स यांनाही सहन करावी लागली होती. सालझोरा येथील नागरिकांनी रोड्रिग्स यांची त्यांच्या वेळ्ळी येथील घरी जाऊन भेट घेताना, तुमचे म्हणणे जर सरकार ऐकून घेत नाही तर सरकार मधून बाहेर पडा असा सल्ला त्यांना दिला होता. या आंदोलनाबाबत ते उघड भूमिका घेत नसल्याने लोकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.