लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओखळल्या जाणाऱ्या सासष्टीत तालुक्यात गत विधानसभा निवडणुकीत रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने सासष्टीत चांगली मते घेतली होती. आपला एकही उमेदवार निवडून आणू शकले नसले तरी त्यांनी अनेक प्रस्थापित उमेदवारांना धक्का दिला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आरजीला कमी लेखता येणार नाही. त्यातच तालुक्यातील काँग्रेसच्या तीन आमदारांपैकी दोघे भाजपमध्ये गेले असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत या तालुक्यात आपली मते राखण्याचे आव्हान काँग्रेससमोर उभे राहिले आहे.
आतापर्यंत सासष्टीतील खिश्चन मतदार काँग्रेससोबत राहिला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सासष्टीमधून काँग्रेस पक्षाला चांगले मताधिक्य मिळाले होते. बाणावली, वेळ्ळी, नुवे या मतदारसंघात खिश्चन मतदार मोठ्या संख्येत आहेत. त्यातील अनेक जण काँग्रेस पक्षाला पर्याय म्हणून आरजीकडे पाहतात. विधानसभा निवडणुकीत बाणावलीतून मिकी पाशेको चौथ्या स्थानावर, तर आरजीचा उमेदवार दुसऱ्या स्थानावर होता. आरजीचे स्थानिक नेते मतदारसंघातील काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन सरकारविरोधात आवाज उठवत असल्याने सासष्टीतील लोक या पक्षाकडे आकर्षित होत आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत आरजी पक्षाने नुवे मतदारसंघात बरीच मजल मारली होती. मात्र, इतर ठिकाणी ते आपला फारसा प्रभाव पडू शकले नाहीत. फातोर्डा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. फातोर्डा मतदारसंघात गोवा फॉरवर्ड पक्ष सक्रिय आहे. आरजी पक्ष आपण स्वतंत्र पक्ष असल्याचे सांगत असला तरी तो सरकारविरोधी पक्षासोबत कोणत्याही चळवळीत सहभागी होत नाही. आपले वेगळे अस्तित्व सिध्द करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण व उत्तर गोव्यातून उमेदवार उभा करणार, असे यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे आरजी दक्षिण गोव्यात आपला किती प्रभाव पाडणार, हे पाहावे लागेल. आरजी पक्ष केवळ काँग्रेस पक्षाच्या मतांचे विभाजन करणार की इतर कुणाच्या मतांचे विभाजन होणार, याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार आहे. सासष्टीतील हिंदू मतदार हा काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षात विभागलेला आहे.
तालुक्यात एके काळी सर्वात जास्त काँग्रेसचे आमदार निवडून येत होते. मात्र, आता हे चित्र उलट झाले आहे. त्यात नुवेचे आमदार सिक्वेरा यांना भाजपने मंत्री केले आहे. सिक्वेरा यांचा नुवे मतदार संघात वैयक्तिक प्रभाव आहे, ते मंत्री असल्याने काही प्रमाणात भाजपला मते मिळवून देण्यात यशस्वी होतील, परंतु ख्रिश्चन मते वळविण्यात त्यांना किती यश येते, हे पाहावे लागले.
सासष्टी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. गत विधानसभा निव- डणुकीत आठपैकी तीन काँग्रेस, दोन आम आदमी पक्ष, एक अपक्ष, एक गोवा फॉरवर्ड आणि एक भाजपचे आमदार निवडून आले. मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा आता भाजपमध्ये आहेत. त्यातच सिक्चेरांना भाजपने मंत्रीही केले आहे. त्यांचा भाजपला लोकसभा निवडणुकीसाठी किती फायदा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सासष्टीत केवळ कुंकळ्ळी मतदार- संघात काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव आहेत. जे कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
आप, गोवा फॉरवर्डची भूमिका महत्त्वाची
२०१९ माली आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी फातोर्डा मतदारसंघाचे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपली भूमिका तटस्थ ठेवली होती. सध्या ते सरकारच्या विरोधात असल्याने कुणाच्या बाजूने राहणार हे समजणे तसे कठीणच आहे. बाणावली व वेळ्ळी मतदार संघात आम आदमी पक्षाचे आमदार आहेत. या भागात ख्रिश्चन मतदारांचा आकडा जास्त आहे. त्यामुळे हे दोन्ही आमदार काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करणार की, आम आदमी पक्ष स्वतःचा उमेदवार उभा करणार, यावरही या तालुक्यातील राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.