पणजी - गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला तरी, या पक्षासमोर सध्या नवे कार्यालय खरेदी करण्यासाठी पुरेसा निधी नाही. यामुळे यापूर्वी ज्या कार्यालयाच्या खरेदीचे सेल डिड काँग्रेस पक्षाने तयार केले होते, त्यावर पक्षाने फेरविचार सुरू केला आहे. नवे पूर्ण कार्यालय खरेदी करण्यावर आपण चार ते पाच कोटी रुपये खर्च करूया नको, या निर्णयाप्रत काँग्रेस पक्ष येऊ लागला आहे. काँग्रेसकडे सोळा आमदार आहेत. हा पक्ष विरोधात असला तरी, सत्ताधारी भाजपापेक्षा काँग्रेसकडे आमदारांची संख्या जास्त आहे. या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी लुईझिन फालेरो हे असताना फालेरो यांनी राजधानी पणजीतील पाटो येथे पक्षासाठी नवे कार्यालय खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली. पाटो हा भाग झपाटय़ाने विकसित झाला असून तेथे जमिनीचे व बांधकामाचे भाव खूप मोठे आहेत. अशा ठिकाणी पाचशे चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा एकूण पाच कोटी रुपयांना फालेरो व त्यांच्या टीमने मिळून काँग्रेस कार्यालयासाठी खरेदी केली. त्यावेळी बांधकाम सुरू होते. आता काम पूर्ण झाले आहे पण काँग्रेस पक्ष चार कोटी रुपये बिल्डरला देणे बाकी आहे. खरेदी खत करताना काँग्रेसने एक कोटी रुपये दिले होते. चौदा लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटीही काँग्रेसने भरली पण आता कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी चार कोटी रुपये बिल्डरला देणे गरजेचे असून हा निधी कुठून आणावा असा प्रश्न काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना पडला आहे, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.
आता फालेरो हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाहीत. फालेरो यांच्यानंतर काही काळासाठी शांताराम नाईक हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आले होते. एवढ्या मोठ्या व एवढ्या खर्चिक कार्यालयाची गरज नाही, असे शांताराम नाईक यांनाही त्यावेळी वाटत होते. प्रदेशाध्यक्ष चोडणकर तसेच काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी आता हे नवे कार्यालय खरेदी करण्यावर पाणी सोडण्याचा विचार चालवला आहे. आणखी तीन-चार कोटी रुपये नव्या कार्यालयावर खर्च करण्यापेक्षा हा पैसा गोव्यात काँग्रेसचे काम वाढवण्यासाठी खर्च करता येतो, अशी चर्चा काँग्रेसमधील चोडणकर समर्थकांमध्ये सुरू आहे. बिल्डरने तीन महिन्यांची मुदत काँग्रेसला निर्णयासाठी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. गोव्यात काँग्रेसचे सध्याचे कार्यालय हे जुन्या इमारतीत चालते. ते भाडेपट्टीवर आहे. नजिकच्या काळात ते कधी तरी सोडावेच लागेल, अशीही पक्षात चर्चा आहे