चामोर्शी (गडचिरोली) : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या विष्णूपूर गावानजीकच्या जंगल परिसरात पोलिसांनी बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास धाड टाकून तेथील ७ लाख १० हजार रुपये किमतीचा मोहसडवा जप्त केला. यातील १२ आरोपी फरार झाले.फरार आरोपींमध्ये उज्ज्वल मंडल, नारायण मंडल, पुष्पजीत मंडल, मनोज मंडल, अजित मंडल, भंजन गुडिया, साधन गुडिया, पूर्नाब सोरदार, निथू शहा, राकेश सकाहारी, ललीत सकाहारी, प्रदीप बैरागी, सुशील बिश्वास आदींचा समावेश आहे. या सर्व आरोपींवर चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावागावात अवैधरित्या मोहफूल दारूच्या विक्रीला उधाण आले आहे तर काही विक्रेते जंगल परिसरात मोहफुलाची दारू काढून त्याचा साठा करण्यावर भर देत आहेत. त्यादृष्टिकोनातून चामोर्शीची पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून दारूविक्रेत्यांवर करडी नजर आहे. विष्णूपूर येथून १ लाख ४२ हजार रुपये किमतीचे भट्टीसाठी वापरण्यात आलेले ड्रम व ७ लाख रुपयांचा मोहसडवा नष्ट केला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर, पोलीस हवालदार दिलीप सोनूले, चंद्रशेखर गमपलवार, नजीर पठाण यांच्यासह इतर कर्मचाºयांनी केली.
चामोर्शी पोलिसांनी केली हातभट्टी उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 9:24 PM