लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : बिहारमध्ये जे राजकीय बदल झाले, त्याची पूर्वकल्पना मला आली होती, असे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सोमवारी सांगितले. विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी आपले कायम चांगले संबंध राहिले आहेत, असेही आर्लेकर यांनी नमूद केले.
'लोकमत'च्या प्रतिनिधीने गोव्याहून आर्लेकर यांच्याशी काल फोनवरून संपर्क साधला. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा रविवारी सकाळी राजीनामा दिला. सायंकाळी भाजपच्या साथीने त्यांचा संसार पुन्हा सुरू झाला. सायंकाळी नव्याने शपथविधी झाला. नितीशकुमार पुन्हा नवव्यांदा मुख्यमंत्री झाले. आपल्याला या घडामोडींची चाहूल लागली होती काय? असे विचारले असता, आर्लेकर हसले. 'एखादी गोष्ट तयार होते तेव्हा कुठून तरी वास हा येतच असतो. तसा वास मला आला होता. त्या अर्थाने मला पूर्वकल्पना आली होती, एवढेच मी म्हणतो. मला कुणी येऊन काही सांगितले नव्हते. संभाव्य घडामोडींची चाहूल मला लागली,' असे आर्लेकर म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी माझे पूर्वीपासूनच चांगले संबंध राहिले. आमच्यात कधी संघर्ष झाला नाही, वितुष्ट आले नाही, असे राज्यपाल आर्लेकर म्हणाले.