म्हापसा : उत्तर गोव्यातील हणजूण या किनारी भागात दर बुधवारी भरणारे तसेच पाच दशकांपासून सुरू असलेले जगप्रसिद्ध फ्ली मार्केटची मूळ संकल्पना आजही तीच असली तरी त्यामागचा उद्देश मात्र कालानुरुप बदलत गेला आहे. आज त्याची व्याप्ती वाढली आहे. त्यातील व्यवहार सुद्धा बरेच वाढले आहेत. सुरुवातीला गोव्यात पर्यटनानिमित्त आलेले फक्त हिप्पी लोक परतीच्या प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी या मार्केटात आपल्या वस्तू विकून जायचे. आज या मार्केटात हिप्पी कमी व स्थानिक जास्त असे स्वरुप झाले आहे. स्वरुप बदलले तरी लोकांच्या प्रतिसादावर मात्र परिणाम झाला नाही.
म्हापसा शहरापासून तसेच कळंगुट येथील प्रसिद्ध किना-यापासून अवघ्या किलोमीटर अंतरावर असलेले हे फ्ली मार्केट पाच दशकापूर्वी हिप्पी अर्थात गोव्यात विदेशातून भ्रमंतीसाठी आलेल्या लोकांनी सुरू केले होते. येताना आणलेल्या विदेशातील वस्तूंची विक्री करुन त्यातून जाण्याचा खर्च वसूल करुन ते माघारी जायचे. त्याकाळी विदेशी वस्तूंची भारी आवड असलेले लोक या मार्केटमध्ये गर्दी करुन ते विकत घेत असे. या वस्तूत जास्त प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होता. त्यानंतर किंमती पुस्तके, कपडे तसेच इतर वस्तूंचा त्यात समावेश होता.
कालांतराने या मार्केटचे स्वरुप बदलत गेले. फ्ली मार्केटला वाढता प्रतिसाद पाहून लोकांची वाढती गर्दी पाहून त्यात बदल होत गेला. मध्यंतरीच्या काळात बनावट इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री सुद्धा त्यात होऊ लागली. हिप्पी लोकच लोकांची फसवणूक करुन ही विक्री करु लागले. तिबेट व नेपाळ देशातील विक्रेते वगळता विदेशी लोकांची जागा देशातील विविध राज्यांतल्या विक्रेत्यांनी तसेच स्थानिकांनी घेतली.
आज दक्षिणेतल्या केरळ, कर्नाटकातील विक्रेत्यांबरोबर पश्चिमेतील गुजरात, उत्तरेतील राजस्थान, काश्मीरी व्यापारी मोठ्या संख्येने व्यापारानिमित्त येऊ लागले. इलेक्ट्रॉनीक वस्तूंची जागा आज कपडे, काचेच्या वस्तू, तयार ज्युवेलरी, हातमागापासून तयार केलेल्या वस्तू यांची विक्री वाढू लागली आहे. या वस्तूंच्या विक्री बरोबर स्थानिकही वस्तू त्यात दिसू लागल्या. अंगावर टॅटू कोरुन घेण्यासाठी सुद्धा बरेच लोक येत असतात.
या मार्केटातील दुकानांची संख्याही बरीच वाढली आहे. हिप्पींच्या काळात अवघेच हाताच्या बोटावर मोजण्या एवढे व्यवसायीक होते आज ही संख्या चार हजारापर्यंत गेली आहे. त्यात फ्ली मार्केटला जोडून उभारण्यात आलेल्या इतर व्यवसायिकांचा सुद्धा समावेश आहे. त्याला जोडून संगीत रजनींचे सुद्धा आयोजन होऊ लागले आहे. आता सकाळी ८ वाजता सुरु होणारे यातील व्यवहार रात्रीपर्यंत चालत असतात. सुरुवातीला रस्त्यावर होणारा हा व्यापार आता जवळील शेतातही भरला जातो. लोकांची पर्यटकांची सततची गर्दी लागून राहिलेली असते. येणारे लोक या मार्केटच्या नावाला आकर्षून आलेले असतात. तर काही लोक खरेदीच्या निमित्ताने येत असतात. वाढलेल्या व्यापामुळे व्यवसायिकातील स्पर्धाही ब-याच वाढल्या आहेत. त्यामुळे वस्तू विकत घेण्यासाठी होणारी घासाघीस जास्त झाली आहे. नोव्हेंबरात सुरु होत असलेले हे मार्केट एप्रिल महिन्यापर्यंत चालते.