पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेत उपचार घेत असले तरी, त्यांनी दूरध्वनीवरून वरिष्ठ अधिका-यांना सूचना केल्यानंतर गोव्यात प्रशासकीय पातळीवर बुधवारी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गोव्यात पर्यावरण आणि माहिती तंत्रज्ञान या खात्याच्या संचालकांसह अनेक अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
श्रीनेथ कोठावळे हे कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. नव्या आदेशानुसार कोठावळे यांची नियुक्ती माहिती व तंत्रज्ञान खात्याचे संचालक म्हणून करण्यात आली आहे. कोठावळे यांच्याकडे गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व माहिती तंत्रज्ञान मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदांचाही अतिरिक्त ताबा दिला गेला आहे. गोव्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रत विविध उपक्रम सुरू आहेत. स्टार्टअप धोरणही सरकारने तयार केले आहे.
पर्यावरण खात्याच्या संचालक पदावरून पराग नगर्सेकर यांना बाजूला करण्यात आले आहे. गोव्यात खनिज खाण व्यवसाय, पर्यटन व्यवसाय, हॉटेल व्यवसाय वगैरे महत्त्वाचे आहेत. या व्यवसायांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण हे अत्यंत महत्त्वाचे खाते ठरते. या खात्याचे कामही अलिकडे वाढले आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचाही याच खात्याशी जास्त संबंध येतो. गोव्यात सध्या खाण धंदा बंद असला तरी, हॉटेल व पर्यटन व्यवसाय तेजीत आहे. सरकारने या खात्याच्या संचालकपदी रवी झा या आयएएस अधिका-याची नियुक्ती केली आहे. झा यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान खात्याच्या संचालक पदाचा ताबा अगोदर होता.
अँथनी डिसोझा यांची नियुक्ती महसुल खात्याचे संयुक्त सचिव म्हणून तर श्यामसुंदर परब यांची नियुक्ती सेंट्रल जेलचे अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. सुरेंद्र नाईक यांची नियुक्ती दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. विजय परांजपे यांच्याकडे शिष्टाचार खात्याचे अतिरिक्त सचिव हे पद सोपविण्यात आले आहे. दीपेश प्रियोळकर यांची नियुक्ती अनुसूचित जमाती कल्याण खात्याच्या प्रशासकीय विभागाचे उपसंचालक म्हणून करण्यात आली आहे. मेघना शेटगावकर यांच्याकडे शिक्षण खात्याच्या प्रशासकीय विभागाचे संचालकपद सोपविले गेले आहे. पर्सनल खात्याचे अव्वल सचिव हरिश अडकोणकर यांच्या सहीने बदली व नियुक्तीचा हा आदेश जारी झाला आहे.