लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : पतीला आपल्या मुलाची कस्टडी घ्यावी लागेल म्हणून आपल्या चारवर्षीय बाळाचा नियोजन करून खून करणाऱ्या बंगळुरूस्थित सूचना सेठ हिच्यावर खुनाचा आरोप ठेवला आहे. सुमारे ६४२ पानी आरोपपत्र कळंगुट पोलिसांनी बालन्यायालयात दाखल केले आहे. घटनेला २० दिवस पूर्ण होण्यापूर्वी हे आरोपपत्र दाखल केले आहे.
आपल्या बाळाचा खून केल्यानंतर भाड्याच्या टॅक्सीने बंगळुरू येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तिला चित्रदुर्ग येथील आय मंगला पोलिसांच्या सहकार्याने कळंगूट पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तेथून तिला गोव्यात आणले होते. पोलिस चौकशीदरम्यान तिनेच खून केल्याचे स्पष्ट झाले होते.
मनोरुग्ण अहवालाची प्रतही जोडली
सूचना मनोरुग्ण असल्याचा दावा तिच्या वडिलांकडून केला होता. मनोरुग्णाच्या झटक्यात तिने आपल्या मुलाचा खून केला, असाही दावा केला होता. केलेल्या दाव्यानंतर तिची मनोरुग्ण रुग्णालयात तपासणी केली व अहवालाची प्रत पोलिसांकडून आरोपपत्राला जोडली. त्यात ती मनोरुग्ण नसल्याचे स्पष्ट केले होते.
५९ साक्षीदारांच्या नोंदी
जानेवारी महिन्यात घडलेल्या या घटनेचा तपास पूर्ण केल्यानंतर हे आरोपपत्र निरीक्षक परेश नाईक यांनी बालन्यायालयात सादर केले. त्यात ५९ साक्षीदारांच्या साक्षी नोंद केल्या आहेत. त्यात तिचा पती, हॉटेलमधील कर्मचारी, तेथील सुरक्षारक्षक, टॅक्सीचालक या अत्यंत महत्त्वाच्या अशा साक्षीदारांचा समावेश आहे. तसेच काही महत्त्वाचे पुरावेसुद्धा पोलिसांकडून जोडण्यात आले आहेत. यात ती ज्या हॉटेलमध्ये राहिली होती, तेथील सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पथकाचे तसेच ठसे तज्ज्ञांचा अहवाल, खोलीत सापडलेले रक्त्ताचे डाग, टिशू पेपर आदी पुराव्यांचा त्यात समावेश होतो. तिच्या बॅगेत बाळाचा मृतदेह आढळला. नंतर त्याच्या पार्थिवावर पोलिसांकडून शवचिकित्सा करण्यात आली.