पणजी : लुईस बर्जर प्रकरणात याच महिन्यात आरोपपत्र दाखल करण्याचे लक्ष्य गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रँच) ठेवले आहे. कोणत्याही स्थितीत ३० सप्टेंबरपूर्वी ते सादर करण्याचा निर्णय गुन्हा अन्वेषण विभागाने घेतला आहे. प्राथमिक टप्प्यावरील तपासावर आधारित पहिले आरोपपत्र तर नंतर जोडआरोपपत्र दाखल केले जाईल. या प्रकरणातील तपासाचा पहिला टप्पा पूर्ण होत आला आहे. या टप्प्यातील तपासावर आधारित आरोपपत्र दाखल करण्याची जय्यत तयारी गुन्हा अन्वेषण विभागाने केली आहे. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे मिळविली आहेत. कायद्यानुसार संशयिताला अटक केल्यानंतर त्यांच्यावर ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करावे लागते. आरोपपत्रासाठी विलंब होण्याची शक्यता असल्यास मुदतवाढीसाठीही काही प्रक्रिया पार पाडावी लागते; परंतु मुदतवाढ न घेता ३० सप्टेंबरच्या आतच ते दाखल करण्याचा निर्णय गुन्हा अन्वेषण विभागाने घेतल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली. मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा अन्वेषण विभागाचे आरोपपत्र जवळजवळ पूर्ण होत आले आहे. त्यावर अखेरचा हात फिरविणे चालू आहे. गुन्हा अन्वेषण विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना सध्या केवळ आरोपपत्र तयार करण्याचे काम दिले आहे. तपास अधिकारी दत्तगुरू सावंत, अधीक्षक कार्तिक कश्यप यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)
याच महिन्यात आरोपपत्र
By admin | Published: September 20, 2015 1:54 AM