पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रँच) आरोपपत्र तयार केले आहे. ते आता केव्हाही न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता आहे. ३० सप्टेंबरपूर्वी आरोपपत्र दाखल करण्याचे या विभागाने ठरवले आहे. या प्रकरणातील आतापर्यंतच्या तपास कामावर आधारित आरोपपत्र तयार करण्याचा निर्णय घेऊन ते काम गतीने सुरू केले होते. ते पूर्ण झाल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली. सध्याचे आरोपपत्र प्राथमिक आहे. त्यानंतर पुरवणी आरोपपत्र जोडले जाईल. आतापर्यंत झालेल्या तपासाला अनुसरून आणि उपलब्ध कागदपत्रे व पुराव्यानुसार आरोपपत्र तयार केले आहे. अजून अमेरिकन न्यायालयातून गुन्हे अन्वेषण विभागाला कागदपत्रे मिळालेली नसली तरी आतापर्यंत मिळालेली कागदपत्रे आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुरेशी असल्याचा या विभागाचा दावा आहे. लुईस बर्जर कंपनीकडून केलेल्या लाचखोरीचे पैसे गोव्यात कोणी कोणाकडून कोणाला दिले आणि किती दिले याची सविस्तर माहिती या विभागाने मिळविली आहे. साक्षीदारांनी नोंदविलेल्या साक्षी या आरोपपत्राचा मुख्य आधार आहे. या विभागाने महत्त्वाच्या सहा साक्षीदारांचे कबुली जबाब पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे नोंदविले होते. त्यापैकी लाच देताना पाहिलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही आहेत. (प्रतिनिधी)
बुधवारपूर्वी आरोपपत्र दाखल करणार
By admin | Published: September 28, 2015 2:59 AM