पणजी - गोव्यात मासळीबरोबरच परप्रांतातून येणाऱ्या दुधातील भेसळही तपासण्यासाठी उद्यापासून कडक मोहीम हाती घेण्यात आहे. शेजारी महाराष्ट्र तसेच कर्नाटकमधून सुमारे २ लाख लिटरहून अधिक दूध रोज आयात होते.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोज सुमारे १ लाख ५0 हजार लिटर दूध शेजारी राज्यांमधून आयात केले जाते. गोवा डेअरीच्या काही दुधाचे नमुने आज तपासणीसाठी घेण्यात आले त्यात काहीही आढळून आले नाही.
आयात होणाऱ्या दुधाची सरकारी आकडेवारी रोज दीड लाख लिटर असली तरी रोज प्रत्यक्षात सव्वादोन लाख लिटरहून अधिक दूध रोज परराज्यातून आयात होत असल्याची माहिती मिळते. दुधामध्ये भेसळ असते अशा तक्रारी अलीकडे वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. महानंदा, गोकुळ, नंदिनी, वारणा, आरोक्य, अमूल, कृष्णा, गोविंदा आदि दूध शेजारी राज्यांमधून रोज गोव्याच्या बाजारात येते.
गोवा डेअरची चेअरमन माधव सहकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘परप्रांतातून येणाऱ्या दुधाबाबत सरकारचे कोणतेही नियंत्रण नव्हते. भेसळ तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्याचे सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. गोव्याच्या बाजारात विक्रीसाठी आणले जाणारे सर्व दूध सरकारने तपासावे. गोवा डेअरी रोज सुमारे ७५ हजार लिटर दुध संकलन आणि विक्री करते. हे दुध तपासले तरी हरकत नाही.’
सहकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘अमुल’चे सुमारे ४५ हजार लिटर, ‘नंदिनी’चे ४0 हजार लिटर, ‘महानंदा’चे १५ ते २0 हजार लिटर, ‘आरोक्य’चे २५ ते ३0 हजार लिटर, ‘कृष्णा’चे २५ ते ३0 हजार लिटर, ‘वारण’चे २0 हजार लिटर, ‘गोविंदा’चे १५ ते १६ हजार लिटर आणि ‘गोकुळ’चे ५ हजार लिटर दुध रोज गोव्यात येते.
सरकारी सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना ‘कामधेनू’ योजनेचा लाभ दिल्यापासून राज्यातील दूध उत्पादन वाढलेले आहे. मात्र दुधाच्या बाबतीत राज्य अजून स्वावलंबी मात्र बनू शकलेले नाही. सध्या रोज ७५ हजार लिटर स्थानिक दुधाचे संकलन होते. २0१२-१३ मध्ये दिवशी सरासरी ४४,२७६ लिटर, २0१३-१४ मध्ये रोज ६0,९५४ लिटर, २0१४-१५ मध्ये दिवशी ६३,२७३ लिटर दुधाचे संकलन झालेले आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी स्थानिक दूध उत्पादनाचा चढता आलेख राहिला आहे.