पणजी : येत्या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने गोव्यात काँग्रेस पक्ष संघटना अधिक सक्रिय व्हावी म्हणून गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी प्रयत्न सुरू केला आहे. चेल्लाकुमार गेले दोन दिवस गोव्यात असून त्यांनी पक्षाच्या विविध शाखांच्या बैठका घेतल्या. पदाधिकारी व आमदारांशी चर्चा केली व पक्ष संघटनेला काही कानमंत्रही दिले आहेत.
दिग्विजय सिंग यांच्याकडून गोव्यातील काँग्रेसचा पदभार यापूर्वी काढून घेतल्यानंतर चेल्लाकुमार हे पूर्णपणे गोव्यातील काँग्रेसचे काम पाहू लागलेत. प्रभारी या नात्याने चेल्लाकुमार गोव्यात आले व त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व अन्य नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. गट काँग्रेस समित्या, काँग्रेसचा आयटी विभाग, सोशल मीडिया विभाग आणि अन्य विभागांच्या चेल्लाकुमार यांनी बैठका घेतल्या. ते दिवसभर पणजीतील काँग्रेस हाऊसमध्येही उपस्थित राहिले होते. पेडणे येथे झालेल्या काँग्रेसच्या सभेवेळीही चेल्लाकुमार यांनी मार्गदर्शन केले.
गिरीश चोडणकर हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनल्यापासून काँग्रेसची पक्ष संघटना विविध प्रकारे चळवळी करू लागली आहे. पण काँग्रेसचे आमदार त्यांना साथ देत नाही. चेल्लाकुमार यांनी आमदारांना काही सूचना करून पक्ष कामात जास्त भाग घेण्याचा सल्ला दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने उत्तर व दक्षिण गोव्यात उमेदवार म्हणून कोणाला उभे करावे हे ठरविलेले नाही पण चेल्लाकुमार यांनी त्यादृष्टीने प्राथमिक स्वरुपाची चाचपणी केली आहे. माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व माजी आमदार जितेंद्र देशप्रभू हे उत्तर गोव्यात तर प्रतिमा कुतिन्हो, गिरीश चोडणकर व सिद्धनाथ बुयाव हे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसचे माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनीही दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणुकीच्या तिकीटावर दावा केला आहे.
भाजपातर्फे उत्तर गोव्यातून केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक हे लढणार आहेत. दक्षिण गोव्यातून भाजपातर्फे विद्यमान खासदार नरेंद्र सावईकर हे लढतील. सध्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे वारंवार आजारी पडत असल्याने भाजपच्या मनोधैर्यावर परिणाम झाला आहे. चेल्लाकुमार यांनी या पार्श्वभूमीवर काँग्रेसला अधिक सक्रिय होण्याचा सल्ला दिल्याची माहिती मिळते.