लोकमत न्यूज नेटवर्क, फर्मागुढी : माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे बांदोडा ग्रामपंचायत, कवळे जिल्हा पंचायत सदस्य यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम फर्मागुढी येथे आयोजित करण्यात आले आहेत.
या दिवसभराच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:३० वाजता जगदंब क्लबच्या ढोल-ताशा पथकाने आणि बालभवनच्या मुलांचे पोवाड्यांच्या सादरीकरणाने (गायन) होईल. सकाळी ८:४५ वाजता फर्मागुढी किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. कृषी मंत्री रवी नाईक, जलस्त्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर, कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, वीज खात्याचे मंत्री रामकृष्ण ढवळीकर, फोंडा नगराध्यक्ष रितेश आर. नाईक, बांदोडा पंचायतीचे सरपंच सुखानंद गावडे, कवळे जि. प. सदस्य गणपत डी. नाईक, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव सुभाष चंद्र, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक, दीपक बांदेकर, इतिहासकार डॉ. अमर आडके व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत फर्मागुढी येथील गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत दयानंद बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. फर्मागुढीच्या गोपाळ गणपती मंदिर परिसरात मुख्य सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषी मंत्री रवी नाईक, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, वीज मंत्री सुदिन ढवळीकर आणि इतर मान्यवर यावेळी लोकांना संबोधित करतील.
कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक डॉ. अमर आडके हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर भाषण करणार आहेत. नंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये ऑल गोवा इंटर कॉलेजिएट क्विझ छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, काळ आणि वारसा या विषयावर अखिल गोवा आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"