लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: कळंगुट पोलीस स्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरूढ पुतळा अवध ठरवून पंचायतीने तो हटवण्याचे आदेश सोमवारी दिल्याने मंगळवारी त्याचे तीव्र पडसाद उमटले. मंगळवारी सकाळपासून शिवप्रेमी पुतळ्याच्या ठिकाणी एकत्र आले व पंचायतीच्या निषेध केला. यावेळी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी जाहीर माफी मागून निर्णय रद्द करण्याच मागणी केली. संतप्त शिवप्रेमींनी दगडफेक केल्याने मोठा तणाव निर्माण झाला. त्याचवेळी दोन गटात धक्काबुक्कीचाही प्रकार घडला. पोलिसांनाही शिवप्रेमींना आवरणे कठीण झाले होते. शेवटी सरपंच सिक्वेरा यांनी पंचायत कार्यालयातून बाहेर येत निर्णय रद्द केल्याचे जाहीर केल्याने जमाव शांत झाला.
सविस्तर वृत्त असे की, कळंगुट पंचायतीच्या आदेशाविरोधात काल सकाळी श्री शांतादुर्गा मंदिरात शिवप्रेमी जमा झाले. देवीला गा-हाणे घालण्यात आल्यानंतर तेथून पंचायतीकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी पोलिसांनी पंचायत कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तरीही संतप्त शिवप्रेमींनी पंचायत कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखून धरले. यावेळी जमावातील काहींनी पंचायत कार्यालयावर दगडफेक केली. दुपारनंतर संतप्त शिवप्रेमींना आवरणे पोलिसांना कठीण बसले होते. त्यातच धक्काबुक्की होण्याचा प्रकारही घडल्यामुळे ज्यादा कुमक बोलविण्यात आली.
यावेळी सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी चर्चेसाठी समोर यावे, अशी मागणी शिवप्रेमी करत होते. परंतु, ते न आल्याने शिवप्रेमी खवळले. हातात भगवे घेऊन जाणाऱ्या शिवप्रेमींच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पंचसदस्यांच्या निषेधाच्याही घोषणा दिल्या जात होत्या. शिवप्रेमींनी कार्यालयात प्रवेश करू नये यासाठी कार्यालयाबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाद टाळण्यासाठी पंचायत कार्यालय बंद केले होते.
आक्षेपार्ह पोस्टमुळे वास्कोत एकास अटक
कळंगुट येथील घटनेनंतर वाडे-दाबोळी येथील एका २२ वर्षीय तरुणाने सोशल मिडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यामुळे मुरगाव तालुक्यात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी वास्को पालिसांनी संबंधित तरुणास रात्री उशिरा अटक केली आहे. या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत शेकडो शिवप्रेमींनी वास्को पोलिस स्थानकावर गर्दी केली आहे.
मॅरेथॉन बैठक
तंग वातावरण निवळत नसल्याने पाहून परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सरपंच जोझफ सिक्वेरा यांच्या सोबत कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपजिल्हाधिकारी यशस्वीनी बी, दोन्ही उपअधिक्षक तसेच निरीक्षक सहभागी झाले होते. तासभराच्या चर्चेनंतर सिक्वेरा आदेश मागे घेण्यास राजी झाले.
वाहनांची तोडफोड
पंचायत कार्यालयाच्या परिसरात पार्क केलेल्या काही वाहनांची मोडतोड करण्यात आली. एका चारचाकीची काच दगड मारून फोडण्यात आल्या. काही संतप्त आंदोलकांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न ही केला. यावेळी आदेश मागे न घेतल्यास आंदोलन प्रखर करण्याचा तसेच प्रसंगी जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा शिव प्रेमींकडून देण्यात आला होता.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दलकडून निषेध
कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याबाबत सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी बजावलेल्या नोटीशीचा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तीव्र निषेध केला आहे. कळंगुट पंचायतीत व संपूर्ण गोव्यात रस्त्यावरती अनेक बेकायदेशीर क्रॉस उभारलेले आहेत त्यांना नोटीसा देऊन ते आधी हटवावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यापुढे कळंगुट पंचायतीने असा प्रयत्न केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशाराही विश्व हिंदू परिषद गोवा मंत्री मोहन आमशेकर यांनी दिला आहे.
पोलीस संरक्षणात सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी कार्यालयाच्या दारावर येऊन आदेश मागे घेत असल्याचे जाहीर केले. दिलेल्या आदेशातून कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागत असल्याचेही सरपंच सिक्चेरा यांनी जाहीर केले.
पोलिस,अधिकाऱ्यांची फौज
पंचायतीकडून देण्यात आलेला आदेश मागे घेण्यात यावा तसेच पंचायतीने शिवप्रेमींची माफी मागावी, अशी मागणी शिवप्रेमी करीत होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी अधीक्षक निधीन वाल्सन, उपजिल्हाधिकारी यशस्वीनी बी, उपअधीक्षक जिवबा दळवी, विश्वेश कर्पे, निरीक्षक परेश नाईक, अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बार्देश तालुक्याचे मामलेदार प्रवीण गावसही होते.
बेकायदा बांधकामांना अभय, मग इथेच कारवाई का?
शिवप्रेमी सतत सरपंच जोझफ सिक्वेरा यांच्या भेटीची मागणी करीत होते. निर्णय पंचायतीने घेतल्याने सरपंचांनी बाहेर यावे व जाहीर माफी मागावी. तसेच राजीनामा सादर करावा, असेही शिवप्रेमी म्हणत होते. कळंगुट परिसरात अनेक बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आली आहेत. त्यांच्यावर पंचायतीकडून कारवाई का केली जात नाही असेही त्यांचे म्हणणे होते.
शिवप्रेमी, सिक्वेरा समर्थकांमध्ये बाचाबाची
कळंगुटमधील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. सरपंच सिक्वेरा यांनी राजीनामा देण्याची मागणी करत शिवप्रेमी आक्रमक झाले असताना आता पंचायतीसमोर सिक्वेरांचे समर्थकही दाखल झाले आहेत. त्यामुळे वातावरण आणखी तापले असून शिवप्रेमी व सरपंच सिक्वेरा समर्थकांत बाचाबाची झाली आहे. यावेळी एकमेकांवर काचेच्या बाटल्या फेकणे व हाणामारीचेही प्रकार झाले.
दगड फेक करू नये. सर्वांनी शांतता पाळावी. हिंसाचारातून काहीच साध्य होणार नाही. सर्व जाग्यावर घालण्याचा प्रयत्न केला जाईल. गोवा राज्य हे शांतता प्रिय राज्य मानले जात असल्याने अशावेळी शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याची गरज आहे.- मायकल लोबो, आमदार
कळंगुट परिसरात रोनाल्डो जॅक सिक्वेरा यांचे पुतळे उभारले जाऊ शकतात, छत्रपती शिवाजी महाजारांचा का नाही? कळंगुट पंचायत क्षेत्रात घडलेल्या प्रकाराला सरपंच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी जाहीरपणे शिवप्रेमींची माफी मागावी. तसेच आपल्या पदाचा राजीनामा सादर करावा. -राजीव झा, केसरीया हिंदू वाहिनी, राष्ट्रीय उपाध्यक्ष