पणजी : जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी ‘चिल्ड्रेन आॅफ ओपिनियन पोल’ या संघटनेने केली आहे.गोवा महाराष्ट्रात विलीन करावा की, विलीन न करता वेगळे ठेवावे याबाबत घेतलेले सार्वमत, म्हणजेच ओपिनियन पोलची लढाई त्यावेळच्या युनायटेड गोवन्स या पार्टीने जॅक सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली लढली होती. त्यामुळे सिक्वेरा हे ओपिनियन पोलचे खरे नायक आहेत आणि त्यांचा पुतळा गोवा विधानसभा संकुलात उभारण्यात यावा, अशी मागणी या संघटनेने केली आहे. संघटनेचे पदाधिकारी प्रजल साखरदांडे, स्वाती केरकर आणि सिद्धेश भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारण्याची मागणी पुढे येत असतानाही मुख्यमंत्री आणि सरकारमधील इतर मंत्र्यांनी यावर कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. मतही व्यक्त केले नाही. मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या बरोबरच मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही याबाबत आपले मत स्पष्ट करावे, असे भगत यांनी या वेळी सांगितले. पुतळा उभारण्याबरोबरच जॅक सिक्वेरा यांच्याविषयी शालेय अभ्यासक्रमात माहिती देणे आणि त्यांची जन्मशताब्दी सरकारी पातळीवर साजरी करणे या संघटनेच्या इतर दोन मागण्या आहेत. जॅक सिक्वेरा हे फादर आॅफ ओपिनियन पोल आहेत, असे भगत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
By admin | Published: May 03, 2015 1:18 AM