नारायण गावस
पणजी: मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेची या आर्थिक वर्षाची पहिली ट्रेन १२ रोजी राज्यातून १ हजार भाविकांना घेऊन वालंकनी जाणार आहे. समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आणि आयआरसीटीसीचे राजीव जैन यांच्या उपस्थितीत करार करण्यात आला. यावेळी समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर उपस्थित होते.
मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, यंदाच्या वर्षीची ही पहिली ट्रेन असून १२ राेजी सकाळी ८ वा. ही ट्रेन भाविकांना घेऊन वालंकनी जाणार आहे. एकूण ४ दिवसाचा हा प्रवास असणार आहे. यानंतर पुढील ट्रेन या शिर्डी, तिरुपती साेडल्या जाणार पण त्यांची अजून तारीख निच्छित केलेली नाही. योजनेअंतर्गत पुढील काही वर्षात अयाेध्येचा समावेश होऊ शकतो. यासाठी सरकारची मान्यता गरजेची आहे.
भाविकांसाठी या ट्रेनमध्ये सर्व सुविधा असणार आहे. डॉक्टर तसेच नर्सही असणार आहेत. तसेच प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये प्रतिनिधी असणार आहे. तरीही भाविकांनी आपले आराेग्य चांगले असेल तरच यावे. या यात्रेवेळी जर चुकून आरोग्याच्या तक्रारी आल्या तर याचा त्रास सर्वांना होणार. त्यामुळे ज्या भाविकांनी आराेग्य चांगले आहे अशांनी दूरच्या यात्रेसाठी यावे असे आवाहन मंत्री फळदेसाई यांनी केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी फक़्त १० करोड रुपये या याेजनेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.