पणजी : दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व गोव्याशी निगडीत काही विषयांवर चर्चा केली. सावंत यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, पक्षाचे संघटन मंत्री सतिश धोंड व खजिनदार संजीव देसाई हे उपस्थित होते. आपली ही सदिच्छा भेट होती, असे मुख्यमंत्र्यांनी लोकमतला सांगितले.
शपथविधी सोहळा झाल्यानंतरची सावंत यांची ही पहिली दिल्ली भेट आहे. सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आदींची भेट घेतली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही ते भेटले. गोव्यातील राजकीय स्थिती, सत्ताधारी आघाडीतील स्थिती, मगोपचे राजकारण याविषयी मुख्यमंत्र्यांनी शहा यांच्याशी चर्चा केल्याचे सुत्रंनी सांगितले. केंद्रीय खाण मंत्र्यांना भेटून मुख्यमंत्री खनिज खाणप्रश्नी त्यांच्याशी चर्चा करतील, असे तेंडुलकर यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील सर्व मंत्र्यांना शुक्रवारी खात्यांचे वाटप केले. मनोहर र्पीकर मुख्यमंत्रीपदी असताना त्यांच्याकडे जी खाती होती, तिच खाती प्रमोद सावंत यांनी स्वत:कडे ठेवली आहेत. पूर्वी मंत्र्यांकडे जी खाती होती, ती खाती मंत्र्यांना देण्यात आली आहेत. सुदिन ढवळीकर यांना सार्वजनिक बांधकाम व वाहतूक, विजय सरदेसाई यांना नगर नियोजन व कृषी, निलेश काब्राल यांना वीज, कायदा व न्याय, विश्वजित राणो यांना आरोग्य, महिला व बाल कल्याण, मिलिंद नाईक यांना समाज कल्याण व नगर विकास, जयेश साळगावकर यांना गृहनिर्माण व बंदर कप्तान, विनोद पालयेकर यांना जलसंसाधन व मच्छीमार अशी खाती देण्यात आली आहेत.