पणजी - मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर हे आपल्या वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीतील एम्स इस्पितळाला भेट देणार आहेत. त्यासाठी गुरुवारी सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री गोव्याहून दिल्लीला रवाना होत आहेत.
पर्रीकर हे गेल्या चतुर्थी सणानंतर दिल्लीतील एम्स इस्पितळात प्रथमच दाखल झाले होते. तिथून ते ऑक्टोबरच्या दुस-या आठवडय़ात गोव्यात परतले व मग ते करंजाळे येथील आपल्या खासगी निवासस्थानीच उपचार घेऊ लागले. पर्रीकर आता नियमित अशा वैद्यकीय तपासणीसाठी एम्समध्ये जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून गुरुवारी सायंकाळी जाहीर केले गेले. गोवा विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशनही गुरुवारी संपुष्टात येत असल्याने गुरुवारीच सायंकाळी दिल्लीला रवाना होणो र्पीकर यांनी पसंत केले. मांडवी नदीवरील तिस:या पुलाच्या उद्घाटनामुळेही पर्रीकर यांचे दिल्लीला वैद्यकीय तपासणीसाठी जाणो लांबले होते.
पर्रीकर यांची प्रकृती नेमकी कशी आहे याविषयी कुणीच माहिती देत नाही. पर्रीकर यांच्या सेवेसाठी कायम डॉ. कोलवाळकर हे काडिओलॉजीस्ट विधानसभा प्रकल्पातही उपस्थित राहिले. दोघा व्यक्तींनी पर्रीकर यांच्या दोन हातांना धरून त्यांना सभागृहात आणावे लागते व खुर्चीवर बसवावे लागते. पर्रीकर अशक्त झाले आहेत व त्यांचे चालणे फारच मंदावले आहे. त्यांच्या नाकात टय़ुब असतानाही त्यांनी अर्थसंकल्प तयार केला व तो विधानसभेत बुधवारी सादर केला. अर्थात हा अर्थसंकल्प पूर्ण दर्जाचा नाही. मुख्यमंत्री पर्रीकर हे दि. 14 ऑक्टोबरला एम्समधून आले तेव्हा जास्त अशक्त होते. अजुनही र्पीकर सचिवालयात आलेच तर त्यांना व्हील चेअरचा वापर करावा लागतो.
दरम्यान, भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी गुरुवारी पर्वरीच्या विधानसभा प्रकल्पाला भेट दिली व त्यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट घेतली. पर्रीकर हे माजी संरक्षण मंत्री असल्याने बिपीन रावत हे आले व त्यांनी र्पीकर यांच्या आरोग्याविषयी विचारपूस केली. आपली सदिच्छा भेट होती व आपण फक्त तब्येतीविषयी विचारपूस केली असे लष्करप्रमुख रावत यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.