पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरुवारी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच दिवस गोमेकॉ रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास मुख्यमंत्र्यांना घरी जाऊ देण्यात आले. मुख्यमंत्री आता थोडे दिवस घरी विश्रांती घेतील, असे सुत्रांनी सांगितले.
गेल्या रविवारी डिहायड्रेशन आणि कमी रक्तदाबाचा त्रास यामुळे बांबोळी येथील गोमेकॉ या सरकारी रुग्णालयात दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहप पर्रीकर हे गुरुवारी सायंकाळी पाच वाजेर्पयत गोमेकॉ रुग्णालयात राहिले. ते पाच दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली राहिले. मुंबईत पुढील उपचारांसाठी जाण्याची मुख्यमंत्र्यांची अजून तरी कोणतीच योजना नाही, असे सुत्रांनी स्पष्ट केले. त्याबाबतच्या चर्चा या फक्त अफवा असल्याचे सांगण्यात आले. पर्रीकर गोमेकॉमधून डिस्चार्ज मिळताच थेट दोनापावल येथील त्यांच्या निवासस्थानी गेले. तिथे ते काही दिवस विश्रंती घेऊन मग पुढील निर्णय घेणार असल्याचे कळते. पर्रीकर यांची प्रकृती आता थोडी सुधारली आहे.
दरम्यान, पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा कुणाकडेच दिलेला नाही. त्यांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांनी गुरुवारी सायंकाळी मंत्रालयात राज्यातील खाणप्रश्नासंबंधी महत्त्वाची बैठक घेतली. सर्वपक्षीय आमदार त्यात सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे गोव्यातील प्रशासनावर परिणाम झाल्याची टीका आता विविध घटकांमधून होऊ लागली आहे. ब-याच फाईल्स प्रलंबित उरल्या आहेत. कारण मुख्यमंत्र्यांकडे एकूण 23 खाती आहेत. त्यातही अर्थ, खाण, गृह, अबकारी, पर्यावरण, उद्योग अशी खाती ही जास्त महत्त्वाची आहेत. राज्यात घटनात्मक पेचप्रसंगासारखी स्थिती असल्याचे मत केंद्रीय कायदा खात्याचे माजी मंत्री रमाकांत खलप यांनीही एके ठिकाणी व्यक्त करून राज्यपालांनी किंवा पंतप्रधानांनी अशा परिस्थितीत हस्तक्षेप करावा अशी मागणी खलप यांनी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनीही मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी खरी माहिती लोकांसमोर भाजपाने ठेवावी अशी मागणी केली व सगळी प्रशासकीय यंत्रणा सध्या कोलमडल्याचे म्हटले आहे. मनोहर पर्रीकर आता घरातून काही महत्त्वाच्या सरकारी फाईल्स निकालात काढतील.