पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपली वैद्यकीय तपासणी करून घेण्यासोबतच पुढील उपचारांसाठी अमेरिकेला निघण्यासाठी मुंबईस रवाना झाले. मुख्यमंत्री 17 ऑगस्टर्पयत गोव्यात उपलब्ध नसतील. त्यामुळे अन्य मंत्रीही आराम अनुभवतील. काही मंत्री आजाराने अगोदरच त्रस्त आहेत. तर काहींनी आपल्या कामासाठी यापुढे मुंबईला किंवा विदेशात जाण्याचे ठरवले आहे.
पर्रीकर यांनी गुरुवारी सायंकाळी मुंबई गाठली. तिथून ते विमानाने अमेरिकेच्या प्रवासासाठी गेले. अमेरिकेला पोहचण्यासाठी एकवीस तासांचा अवधी लागतो. पर्रीकर 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत प्रथमच सभापती डॉ. प्रमोद सावंत हे 15 रोजी जुन्या सचिवालयात होणाऱ्या सोहळ्यावेळी तिरंगा फडकावतील. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा व अन्य वरिष्ठ अधिकारी प्रशासकीय कामे हाताळतील. मुख्यमंत्री अमेरिकेहून त्यांच्या संपर्कात असतील, असे सुत्रांनी सांगितले आहे. मात्र, पर्रीकर 17 ऑगस्टपर्यंत अनुपस्थित असतील असे सरकारने जाहीर केले आहे. पर्रीकर सरकारमधील तीन मंत्री सध्या आजारी आहेत. त्यापैकी नगर विकास मंत्री फ्रान्सीस डिसोझा हे आपल्या म्हापसा येथील निवासस्थानी असले तरी, त्यांच्याशी कुणाचाही जास्त संपर्क होत नाही. ते घराकडूनच काम करतात. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर हेही घरातून काम करतात. सध्या त्यांची प्रकृती सुधारली आहे. वीजमंत्री पांडुरंग मडकईकर हे अजून मुंबईतील इस्पितळात उपचार घेत आहेत. दरम्यान, पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठकही होणार नाही. त्यामुळे दोघे मंत्री विदेश दौऱ्यावर जाऊन येण्याच्या तयारीत आहेत. तर अन्य दोन मंत्री मुंबईला जाऊन येणार आहेत. पर्रीकर अमेरिकेला असल्याने आम्हालाही जरा आराम मिळतो, असे काही आमदारांचेही म्हणणे आहे. बारा दिवसांच्या विधानसभा अधिवेशनाच्या कामातही काही मंत्री, आमदार बरेच व्यस्त राहिले होते. त्यामुळे थकवा घालविण्यासाठी आता सात दिवस भेटतील. मुख्यमंत्र्यांनी यावेळी तीन मंत्र्यांची समिती वगैरे नेमली नाही. गतवेळी ते जास्त दिवस अमेरिकेत होते, त्यामुळे ती समिती नेमली गेली होती, असे सरकारी सुत्रांनी सांगितले. गेल्या मार्चमध्ये पर्रीकर तीन महिने न्यूयॉर्कमधील रुग्णालयात उपचार घेऊन आले आहेत.