पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत निश्चितच सुधारणा झालेली आहे. मात्र, ते पर्वरी येथील सचिवालयात येऊन काम सुरू करणे हे जवळजवळ अशक्य बनलेले आहे. यापुढे मनोहर पर्रीकर सचिवालयात येणारच नाहीत. त्यांच्या निवासस्थानालाच सचिवालयाचे रुप प्राप्त झाल्यासारखी स्थिती तूर्त अनुभवास येत आहे, अशी चर्चा अधिका-यांमध्ये सुरू आहे.
दिल्लीतील एम्स इस्पितळात असताना मनोहर पर्रीकर यांची प्रकृती जशी होती, त्या तुलनेत आता ती चांगली आहे. मात्र मनोहर पर्रीकर हे पातळ आहार घेतात. ते शारिरीकदृष्टय़ा अशक्त असल्याने व्हीलचेअरवर बसतात, असे त्यांना प्रत्यक्ष भेटलेल्या तिघा आमदारांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले.
मनोहर पर्रीकर यांच्या नाकात एकाबाजूने ट्यूब आहे. ते घरात फिरतात पण घराबाहेर पडून चक्क सचिवालयातून कारभार पुढे नेणे शक्य नाही याची खात्री आमदारांनाही पटली आहे. मनोहर पर्रीकर यांना सातत्याने त्यांचे आरोग्य तपासून घ्यावे लागेल. त्यांच्या सेवेसाठी डॉक्टर तयारच असतात. मनोहर पर्रीकर यांची बौद्धीक क्षमता कमी झालेली नाही. पण त्यांना करंजाळे येथील आपल्या निवासस्थानीच राहणे भाग पडले आहे. मनोहर पर्रीकर आता अधिका-यांच्या, मंत्री, आमदारांच्या बैठका करंजाळे येथील त्यांच्या घरीच घेतात. त्यांच्या घरातच छोटे सचिवालय अशा प्रकारे आकारास येऊ लागले आहे.
मनोहर पर्रीकर यांच्या पर्वरीतील मंत्रालयातील केबिनमधील एक-दोन अधिकारी हे सातत्याने त्यांच्या घरीच असतात. हे अधिकारीच मनोहर पर्रीकर यांचा फोन कुणाही मंत्री किंवा आमदाराशी जोडून देतात. अर्थात मनोहर पर्रीकर यांचे फोनवरील बोलणेही कमी झालेले आहे. पूर्वी ते खूप बोलत असते. आता अत्यंत तातडीच्या कामापुरतेच ते बोलतात. गेले चार महिने मनोहर पर्रीकर यांची एकही पत्रकार परिषद झालेली नाही किंवा गेले दोन महिने मनोहर पर्रीकर यांनी एकदाही व्हिडीओद्वारे आपला संदेश गोमंतकीयांना पाठवलेला नाही. मनोहर पर्रीकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींद्वारे राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भुषविले हा मध्यंतरी एका मंत्र्याने केलेला दावा कुणालाच पटला नाही, उलट त्या दाव्याची विरोधकांकडून खिल्ली उडवली गेली.
मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयीची सद्यस्थिती कळावी म्हणून एका एनजीओच्या कार्यकर्त्यांना न्यायालयास याचिका सादर केली आहे. मनोहर पर्रीकर यांना स्वत:चे आरोग्य गुप्त ठेवण्याचा अधिकार आहे असा दावा सरकारने करून ती याचिका मेन्टेन करण्यासारखीच नाही अशी भूमिका घेतली आहे. आज शुक्रवारी मुख्य सचिव न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत. ती याचिका मेन्टेन करण्यासारखी कशी नाही ते सांगण्याचा प्रयत्न मुख्य सचिव प्रतिज्ञापत्रतून करणे अपेक्षित आहे.
दरम्यान, मनोहर पर्रीकर दिवाळीनंतर सचिवालयात येतील हा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी यापूर्वी केलेला दावा चुकीचा ठरला आहे. दिवाळी पार पडली व आता नाताळ सणही जवळ आला आहे.