पणजी - बारा दिवसांची अमेरिका भेट आटोपून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे बुधवारी अमेरिकेहून परतले आहेत. मुख्यमंत्री गेल्या 10 रोजी वैद्यकीय तपासणी व उपचारांसाठी अमेरिकेला गेले होते. ही त्यांची आरोग्याच्या कारणास्तव दुस-यांदा अमेरिका भेट होती. मुख्यमंत्री 18 रोजी गोव्यात परततील असे अपेक्षित होते. त्यामुळे दि. 10 ते दि. 17 ऑगस्टर्पयत पर्रिकर गोव्यात नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अमेरिकेला पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यांना त्यांचे तेथील वास्तव्य काही दिवसांनी वाढवावे लागले. मुख्यमंत्री अमेरिकेहून गोव्यास येण्यासाठी निघाल्याची माहिती पर्रिकर यांच्या बहुतेक मंत्री व आमदारांना मिळाली आहे. मुख्यमंत्री गोव्यात पोहचत असताना गोव्याचे तीन मंत्री मात्र विदेशात आहेत. या शिवाय वीज मंत्री पांडुरंग मडकईकर हे अजून मुंबईच्या इस्पितळात आहेत तर नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे उपचारांसाठी अमेरिकेला पोहचले आहेत. मंत्री डिसोझा कधी गोव्यात परततील याची नीट कल्पना गोव्याच्या अन्य मंत्र्यांना व अनेक अधिका-यांनाही नाही, असे सुत्रांनी सांगितले. भाजपमधीलही काही प्रमुख पदाधिकारी त्याविषयी अनभिज्ञ आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री पर्रिकर यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हे अमेरिकेला गेले होते. मुख्यमंत्री पर्रिकर शुक्रवारी 24 रोजी स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी विसजर्नावेळी मांडवी किनारी होणा-या कार्यक्रमावेळी उपस्थित राहणार आहेत. सरकारच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाचे डॉ. कोलवाळकर हेही मुख्यमंत्र्यांसोबत अमेरिकेला गेले होते. मुख्यमंत्री पर्रिकर यापूर्वीच्या काळात तीन महिने अमेरिकेतील स्लोन केटरींग स्मृती इस्पितळात उपचारांसाठी दाखल होते. त्याच इस्पितळात आता ते पुढील उपचारांसाठी गेले होते.