पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दोनापावल येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. तिथे चोवीस तास ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यामुळे सरकारमधील घटक पक्ष सध्या पर्यायी मुख्यमंत्री कोण याविषयी चर्चा करू लागले आहेत.पर्रीकर हे दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेत होते. तिथे त्यांनी उपचार पूर्ण केले नाहीत. शुक्रवारी रात्री त्यांना दिल्लीतच खूप ताप येत होता. त्यामुळे त्यांना एम्सच्या अतिदक्षता विभागातही (आयसीयू) हलविण्यात आले होते. पर्रीकर काल गोव्यात परतले. मात्र ते आतापर्यंत कुठल्याच मंत्री किंवा आमदाराला भेटू शकलेले नाहीत. पर्रीकर हे दोनापावल येथील त्यांच्या निवासस्थानी उपचार घेत आहेत. त्यांना स्ट्रेचरवरूनच घरी नेले गेले. त्यांच्या निवासस्थानीही भाजपमधील कुणीच मंत्री किंवा आमदार जाऊ शकले नाहीत.पर्रीकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या दोनापावल येथील निवासस्थानी 24 तास डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यांच्या खोलीत सर्वच वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवल्या गेल्या आहेत. वीज मंत्री निलेश काब्राल यांनी यापूर्वी पर्रीकर यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. पण भेट झाली नाही. 62 वर्षीय पर्रीकर यांना स्वादूपिंडाचा गंभीर आजार जडलेला असून गेले आठ ते नऊ महिने ते उपचार घेत आहेत. काही तरी जादू घडावी व पर्रीकर यांची प्रकृती पूर्ण ठिक व्हावी, अशी प्रतिक्रिया मंत्री काब्राल यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रीग्ज यांनी पर्रीकर यांच्या निवासस्थानी सर्व सरकारी वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्याबद्दल टीका केली आहे. सरकारची सगळी यंत्रणा एखाद्या नेत्याच्या निवासस्थानी का म्हणून ठेवावी असा रॉड्रीग्ज यांचा प्रश्न आहे. रॉड्रीग्ज यांनी याच विषयावरून न्यायालयात धाव घेतली आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 1:08 PM