पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या तोंडी आदेशावरून कदंब पठारावर बेकायदेशीर उत्खनन सुरू होते असे भाजपचेच महासचीव हेमंत गोलतकर यांनी केले असल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना समन्स बजावे अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केली आहे. गोलतकर यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आल्यामुळे त्यांना अटक करण्याची मागणीही नाईक यांनी केली. जुने गोवा बायपास रस्त्यावरील कदंब पठारावर जे बेकायदेशीर उत्खनन सुरू होते ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाने सुरू होते याची कबुली खुद्द भाजपचेच नेते आणि उत्खनन करणारे गोलतकर यांनी दिल्यामुळे पोलीसांना या प्रकरणचा तपास करणे अधिक सोपे झाले आहे. पोलिसांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांना समन्स बजावण्यात यावे आणि चौकशीला पाचारण करावे. संशयित म्हणून किंवा साक्षिदार म्हणून तरी मुख्यमंत्र्यांमा समन्स पाठवावा लागेल असे नाईक म्हणाले. सत्तेचा गैरवापर करून कायदे नियम न जुमानता उत्खनन करण्याचा प्रकार हा अत्यंत गंभीर आहे. केवळ गुन्हा नोंदवून भागणार नाही. त्यांच्यावर नगर नियोजन कायद्याचे कलमही गुन्हात जोडण्यात यावे. हा अदखलपात्र सव्रुपाचा गुन्हा असून दोषी ठरल्यास १ वर्ष तरी तुरुंगवास त्यानुसार ठोठावला जावू शकतो असे ते म्हणाले. म्हादयी प्रकरणात विनोद पालयेकर यांनी कर्नाटकातील लोकांचा केलेल्या ‘हरामी’ या उल्लेखाविषयी विचारले असता हे शब्द पालयेकर यांच्या तोंडून नकळत आले असावेत. त्याचा शब्दश: अर्थ घेण्याची आवश्यकता नसल्याचे नाईक यांनी सांगितले. म्हादयी प्रकरणात मुख्यमंत्री पर्रीकर यांनी येड्युरप्पा यांना लिहिलेल्या पत्राला महत्त्व नाही या त्यांच्या भुमिकेशी सहमतीही त्यांनी व्यक्त केली. हा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्यास कॉंग्रेस पक्षाचा विरोध राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कॉंग्रेस हाऊसमध्ये विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर आणि आमदार आलेक्स रेजिनाल्ड उपस्थित होते.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पोलिसांनी समन्स पाठवावे, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 7:45 PM