पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती एम्समध्ये उपचारासाठी होते त्यापेक्षाही आता सुधारली आहे. त्यांची स्मृतीही चांगली आहे, असा दावा नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी केला. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘ विरोधक ज्या पध्दतीने पर्रीकर यांचे चित्र रंगवित आहेत ते चुकीचे आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत माझे तीन विषय त्यांनी प्रामुख्याने घेतले आणि त्यावर स्वत:हून चर्चाही केली. सासष्टी तालुक्याचे दोन महत्त्वाचे विषय गेली अनेक वर्षे पडून होते. हे विषय टाळले जात आहेत की काय, असे मला वाटले होते परंतु पर्रीकर स्वत:च या विषयांवर बोलले आणि मार्गही काढला. गेली ३0 वर्षे काँग्रेसने हे प्रश्न सोडवले नव्हते. त्यांची स्मृतीही चांगली आहे.’सरदेसाई पुढे म्हणाले की, ‘पर्रीकर हे कामसू असल्याने नेहमीच कामात गर्क रहात असत. त्यांच्या आजारपणामुळे सरकारवर परिणाम झाला आहे, हे मान्य करावेच लागेल.’मध्यंतरी स्थापन केलेल्या जी-६ गटाबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता हा गट अजून जिवंत आहे, असे सरदेसाई म्हणाले. नेतृत्त्वाबाबत कायमस्वरुपी तोडगा मिळाला का, या प्रश्नावर पर्रीकर हेच सध्या आमचे नेते आहेत आणि तेच मुख्यमंत्री आहेत, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
मासळी व्यापा-यांना मार्गदर्शक तत्त्वे पाळावीच लागणार : सरदेसाई मासळी आयातीबाबत शेजारी सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या इशा-याचा मंत्री सरदेसाई यांनी समाचार घेतला. मासळी आयात करणा-यांकडे एफडीएची नोंदणी आणि इन्सुलेटेड वाहन या अटी पाळाव्याच लागतील. त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि कोणाच्या धमक्याही सहन केल्या जाणार नाहीत, असे ते म्हणाले. सिंधुदुर्गातील मासळीवाहू वाहने अडविल्यास गोवा पासिंगचे एकही वाहन सिंधुदुर्गातून जाऊ देणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता. गोव्यातील लोकांना दर्जेदार अन्न, मासळी मिळावी यासाठी सरकार कटिबध्द आहे.