पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. भागवत यांना भेटण्याची संधी मुख्यमंत्री सावंत यांना प्रथमच मिळाली. यापूर्वी कधी ते संघचालकाना भेटले नव्हते.
मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्रीपदी असताना व नंतरही अनेकदा भागवत यांना भेटले होते. पर्रीकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री सावंत हे १९ मार्च २०१९ रोजी मुख्यमंत्री बनले. मात्र नागपूर येथे जाऊन त्यांनी कधीच भागवत यांची भेट घेतली नव्हती. त्यांना आता ती संधी गोव्यात मिळाली. भागवत हे तूर्त गोवा भेटीवर आहेत. वेलिंग येथील एका देवस्थान परिसरात भागवत यांचा निवास आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी शनिवारी सायंकाळी तिथे जाऊन भागवत यांची भेट घेतली.
गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या विषयावरून पूर्वीच फूट पडलेली आहे. इंग्रजी शाळांना अनुदान सुरू ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे दुखावलेले अनेक स्वयंसेवक हे अजुनही भाजपासोबत नाहीत. काही स्वयंसेवक तर भाजपचे कट्टर विरोधकही झालेले आहेत. काही संघ स्वयंसेवकांनी सुभाष वेलिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवा राजकीय पक्षही जन्मास घातला. अर्थात मुख्यमंत्री सावंत हे शनिवारी भेटले तरी या विषयासंबंधी भागवत यांनी मुख्यमंत्र्यांना काही विचारले नाही.
मुख्यमंत्र्यांसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व संघटनमंत्री सतिश धोंड हेही उपस्थित होते. गोव्यातील भाजपचे काम व अन्य काही विषयांवर भागवत यांच्याशी खूप त्रोटक स्वरुपात चर्चा झाली असे पक्ष सुत्रांनी सांगितले. गोव्यातील भाजपा व गोव्यातील संघाचे पदाधिकारी यांच्यात समन्वय बैठका अधूनमधून सुरू असतात याचीही कल्पना भागवत यांना देण्यात आली.