लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: एडीआर या संस्थेने देशभरातील मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेचा तपशील जाहीर केला असून, त्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत १२व्या स्थानी आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सावंत यांची मालमत्ता केवळ २ कोटी रुपयांनी कमी आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मालमत्ता ११ कोटी रूपये, तर प्रमोद सावंत यांची मालमत्ता ९ कोटी रुपयांची आहे. देशभरातील ३० पैकी २९ मुख्यमंत्री करोडपती असून, हे प्रमाण ९७ टक्के आहे. १३ मुख्यमंत्र्यांविरूध्द खुनाचा प्रयत्न अपहरण आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत व हे प्रमाण ४३ टक्के असल्याचे एडीआरने म्हटले आहे.
देशभरातील राज्ये व संघप्रदेश मिळून ३० मुख्यमंत्र्यांची मालमत्ता एडीआर या संस्थेने उघड केली आहे. या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच निवडणूक लढवताना आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्ता व इतर माहिती सादर केलेली आहे, त्या आधारावर एडीआरने ती उघड केली आहे.
आंध्राचे मुख्यमंत्री सर्वाधिक श्रीमंत
मुख्यमंत्री सावंत यांनी आपला व्यवसाय आयुर्वेदिक डॉक्टर दाखवला असून, एकूण ९.३७ कोटी रुपयांची मालमत्ता व १.५० कोटींचे कर्ज दाखवले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे सर्वात श्रीमंत आहेत. त्यांची मालमत्ता ५१० कोटी रुपयांची आहे, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी सर्वात कमी १५ लाख रुपयांची मालमत्ता दाखवली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"