पणजी : राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून पशूवैद्यक विज्ञान तसेच त्यानंतर बीएससी इन फिशरीज हा अभ्यासक्रमही सुरु केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. सातवा मत्स्य महोत्सव येत्या २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत होणार असून त्या निमित्त मुख्यमंत्र्यांहस्ते ‘फ्लॅग ॲाफ’ झाले. या प्रसंगी मच्छिमारी खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर, संचालिका डॉ. शर्मिला मोंतेरो तसेच खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यात मत्स्य उद्योगातून दरवर्षी सुमारे १ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. मासळीवरील प्रक्रिया व निर्यात यातून पैसा कमावता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बीएससी इन फिशरीज या अभ्यासक्रमाकडे वळावे. सध्या बीएससी इन फिशरीज हा अभ्यासक्रम करण्यासाठी गोव्याच्या विद्यार्थ्यांना दापोली येथे जावे लागते. तेथे तीन जागा गोवेकरांना राखीव आहेत. विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर हा अभ्यासक्रम करता येतो. तसेच पशुवैद्यक बीएससीसाठीही आठ जागा राखीव आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च सरकार उचलते. परंतु यापुढे हे दोन्ही अभ्यासक्रम गोव्यात सुरु केले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
नीलक्रांतीमुळे मत्स्य व्यवसायातील अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळणार आहे. किनारपट्टीतील राज्यांना याचा विशेष लाभ होणार आहे. गोव्यातील विद्यार्थी, जे मत्स्य व्यवसायात आपले भवितव्य घडवू इच्छितात त्यांनी या क्षेत्रातील उच्च शिक्षण घ्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, मत्स्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी या मेगा फिश फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. सातवा ‘ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टीव्हल’ वरील काळात कांपाल येथे साग मैदानावर होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मासे या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवले जाणार असून शाळकरी विद्यार्थी तसेच इतरांना वेगवेगळ्या प्रकारची मत्स्य संपत्ती येथे पाहता येईल.