पणजी : मडगाव येथे येत्या ६ फेब्रुवारी रोजी होणार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेवेळी गेल्या दहा वर्षात जी विकासकामे झाली, त्याची माहिती मोदींना दिली जाईल तसेच प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मानही केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
सभेच्या तयारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आढावा बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ' सभेच्या दिवशी 'विकसित भारत, विकसित गोवा रॅली' काढली जाईल.
या जाहीर सभेला पन्नास हजार लोकांची उपस्थिती लाभेल, असे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यानुसार मंडल अध्यक्ष व इतर पदाधिकारी, आमदार, मंत्री यांना जबाबदारीही वाटून दिलेली आहे.
गोवा भेटीवर आलेले भाजपचे लोकसभा निवडणूक प्रभारी आशिष सूद यांनी मंगळवारी पक्षाची कोअर टीम, प्रमुख कार्यकर्ते मंडल अध्यक्ष, आमदारांची बैठक घेऊन सभा यशस्वी करण्यासाठी काय करावे लागेल, यासाठी महत्त्वाच्या सूचनाही केल्या होत्या. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. सभेच्या बाबतीत कोणतीही कसूर राहू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. वाहनांसाठी पार्किंग तळ व इतर सुविधा निर्माण केल्या जात आहेत.
दरम्यान, मडगावला कदंब बस स्थानकानजीक ही सभा होणार आहे. मडगाव पालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत कठोर उपाययोजना सुरू केल्या असून बस स्थानक परिसरातील दोन हॉटेल्सना सांडपाणी सोडल्या प्रकरणी कारवाई का करू नये? अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा बजावल्या आहेत.