पणजी : गोमंतकियांना गोव्यातच संधी उपलब्ध व्हायला हवी. गोव्यात माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा यापूर्वी विकास न झाल्यामुळे येथील तरुणाई गोव्याबाहेर गेली. गोवा हे छोटे राज्य असले तरी, प्रमाणापेक्षा अधिक बुद्धीवान लोक हे राज्य जन्माला घालत आहे. यापूर्वीच्या काळात मंगेशकर कुटुंबीयांनाही गोव्यात संगीत क्षेत्रामध्ये संधी नव्हती. त्यामुळेच त्यांना गोव्याबाहेर जावे लागले, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले.
सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याने आयोजित केलेल्या सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांनी जनतेला उद्देशून भाषण केले. संरक्षण क्षेत्र, संगीत, कला आदी विविध क्षेत्रांमध्ये गोव्याने बुद्धीवान लोक निर्माण केले आहेत. गोवा हे आयटी स्टार्टअपचे हब होऊ शकते. फक्त संधी मिळायला हवी. संगीत क्षेत्रात गोव्यात संधी मिळाली असती तर, मंगेशकर कुटुंबीयही गोव्यातच राहिले असते, असे पर्रिकर यांनी म्हटले. तसेच गोव्यातून बाहेर बुद्धीवान लोक जाण्याऐवजी बाहेरील बुद्धीवान व्यक्तींनी गोव्यात यावे, असे आपणास वाटायला हवे. त्यासाठी येथे संधी निर्माण करायला हव्यात, असेही ते म्हणाले.
गोव्याचे आयटी बुद्धीवान मनुष्यबळ हे सध्या पुणे व बंगळुरचे आयटी इंजिन चालवत आहे. गोवा हे पहिले राज्य आहे, जेव्हा मुलांना सायबर एज योजनेअंतर्गत संगणक व लॅपटॉप दिले गेले. केवळ पाचशे रुपयांचे नाममात्र शुल्क घेऊन आता मुलांना लॅपटॉप दिले जात आहेत. गोवा हे छोटे राज्य असले तरी, दीड कोटी गोमंतकीय देशात व जगात राहतात. गोव्याची लोकसंख्या पंधरा लाख असली तरी, परप्रांतांमध्ये गोमंतकीय लोकांची संख्या खूप आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.