पणजी - गोव्यात पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांचा संप सुरू असला तरी, स्पीड गवर्नर लागू करण्यापासून टॅक्सींना वगळावे ही टॅक्सी व्यवसायिकांची मागणी कायद्यानुसार मान्य करता येत नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी येथे जाहीर केले. टॅक्सींना स्पीड गवर्नर बसविणे हे केंद्र सरकारच्या कायद्यानुसार गरजेचे असल्याने आपण त्याविषयी काही करू शकत नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. पर्यटक टॅक्सी व्यवसायिक शुक्रवारपासून संपावर गेले आहेत. आज रविवारीही त्यांनी संप सुरू ठेवण्याचे ठरवले आहे. स्पीड गवर्नरला टॅक्सी व्यवसायिकांचा विरोध आहे. स्पीड गवर्नरमुळे टॅक्सी व्यवसायिकांना प्रति किलोमीटर ताशी साठपेक्षा जास्त गतीने वाहन हाकताच येणार नाही असे टॅक्सी व्यवसायिकांचे म्हणणो आहे. सरकारने कदंब वाहतूक महामंडळ आणि गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे बसगाडय़ांची व खासगी कारगाडय़ांची व्यवस्था पर्यटकांच्या वाहतुकीसाठी केली आहे पण ती पुरेशी नाही. शनिवारीही पणजीतील आझाद मैदानावर हजारो टॅक्सी व्यवसायिक जमले व त्यांनी सरकारचा निषेध केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणो ऐकून घेतले. मुख्यमंत्री र्पीकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले, की टॅक्सी व्यवसायिकांनी संपावर जाण्यापूर्वी त्यांच्या मागण्यांचे निवेदनच सरकारला सादर केले नाही. अजुनही त्यांनी निवेदन दिले नसल्याने अधिकृतरित्या त्यांची मागणी आम्हाला ठाऊक नाही पण स्पीड गवर्नरला त्यांचा आक्षेप असल्याचे कळते. स्पीड गवर्नर हा सहा महिन्यांपूर्वीच वाहनांना लागू झाला होता. आम्ही स्पीड गर्वनर खरेदी करण्यासाठी टॅक्सी व्यवसायिकांना सहा महिन्यांची मुदत दिली होती. केंद्र सरकारने हा कायदा लागू केला आहे. प्रत्येक राज्याने तो स्वीकारला आहे. गोव्यातील टॅक्सी व्यवसायिकांचाच त्यास कशाला आक्षेप ते मला कळत नाही. स्पीड गवर्नर जर टॅक्सींना लावला नाही तर येत्या दि. 24 फेब्रुवारीनंतर टॅक्सी निरुपयोगी ठरतील. त्याना कुठलाच आरटीओ फिटनेस प्रमाणपत्र देणार नाही.काँग्रेसची आज पर्रीकरांशी चर्चा दरम्यान, टॅक्सी व्यवसायिकांची मागणी सरकारसमोर मांडण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक व अन्य काँग्रेस नेते आज रविवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी भेटीची वेळ मागितली होती. दुपारी बारा वाजता मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळ दिली आहे. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने सगळी व्यवस्था केली असल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणो आहे. सरकारी कंत्रटावर ज्या टॅक्सी आहेत व ज्या गेल्या शुक्रवारी रुजू झाल्या नाहीत त्यांचे कंत्रट रद्द केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यात पर्यटकांचे हाल पण मुख्यमंत्री म्हणाले टॅक्सींना स्पीड गवर्नर लावावेच लागतील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 7:27 PM