पणजी : माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी गोव्याच्या क्षमतेचा अभ्यास करण्याची आणि पश्चिम घाटाचे संरक्षण करण्याची व्यक्त केलेली गरज स्वागतार्ह आहे. मुख्यमंत्र्यांनी हा त्यांचा सल्ला जरूर ऐकावा, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.
युरी म्हणाले की,' मला आशा आहे, मुख्यमंत्री गोव्याचे जावई सुरेश प्रभू यांचे हे शहाणपणाचे बोल ऐकतील आणि पुढील नुकसान थांबविण्यासाठी कृतीशील पावले उचलतील.
राज्यात लोकसंख्या वाढत आहे इतर राज्यातील लोक येथे स्थायिक होत आहेत या पार्श्वभूमीवर गोव्याच्या एकंदर भार वाहून नेण्याच्या क्षमतेचा अभ्यास करण्यासाठी पाऊले उचलण्यासंबंधी प्रभू यांनी आवाहन केले आहे. युरी म्हणाले की, गेल्या बारा वर्षांपासून काँग्रेस हीच मागणी करत आहे.'
तीन वादग्रस्त प्रकल्पांवर काँग्रेसने आवाज उठवला. तमनार बीज प्रकल्पाच्या बाजूने बोलणाऱ्यांचे आणि गोव्यात मोठ्या प्रमाणावर जमीन रूपांतरण आणि जमिनींच्या विक्रीला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे डोळे सुरेश प्रभू यांनी उघडले आहेत. म्हादई वन्यजीव अभयारण्यात व्याघ्र प्रकल्पाला विरोध करणाऱ्या सर्वांसाठी ही धोक्याची घंटा आहे. प्रभू यांनी सत्य बोलून भाजप सरकारला आरसा दाखवला, असे युरी पुढे म्हणाले.
'मुख्यमंत्री सावंत यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेल्या गोवा व्हिजन २०३५ अहवालाची अंमलबजावणी करुन तसेच प्रभू यांचा सल्ला घेऊन गोव्याचे पूढे अधिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी कृतीशील पावले उचलावीत.जर आपण पश्चिम घाटासारख्या जैव-विविधतेने समृद्ध प्रदेशाचे आताच संरक्षण केले नाही, तर आपल्याला एक दिवस दूधसागर धबधब्यातून पाण्याचा एक थेंबही खाली पडलेला दिसणार नाही. आमची जीवनदायीनी आई म्हादई कोरडी होऊन गोव्याचे वाळवंटात रुपांतर करील, असे युरी शेवटी म्हणाले.