पणजी : बार्देश तालुक्याला रवींद्र भवन हवे आहे. म्हापशात आतापर्यंत जागा निश्चित होऊ शकली नाही. आपण पुढाकार घेऊन लवकरच जागा निश्चित करू, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासावेळी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.करासवाडा- पेडे येथे क्रिकेट स्टेडियमसाठी जी जागा अगोदर घेतली होती, तिथे कोमुनिदादीची जमीन उपलब्ध आहे. तिथे तरी रवींद्र भवन बांधले जावे, आपण स्वत: त्यासाठी कोमुनिदादीशी चर्चा करीन, असे आमदार हळर्णकर यांनी सांगितले. सर्व तालुक्यांमध्ये रवींद्र भवने उभी राहीली पण बार्देशसाठी अजूनही सरकार रवींद्र भवन का उभे करत नाही, अशी विचारणा आमदार हळर्णकर यांनी केली.आमदार दिगंबर कामत व इतरांनी हळर्णकर यांना पाठिंबा दिला. आपण मुख्यमंत्रिपदी होतो तेव्हा म्हापसा शहरात पोलीस स्थानकाच्या विरुद्ध दिशेने असलेल्या जागेत रवींद्र भवनासाठी भूखंड निश्चित केला होता, असे कामत म्हणाले. बार्देशमध्ये सात आमदार असून त्यांनी जागा निश्चित करण्यासाठी सरकारला मदत करावी, आम्हाला बार्देशसाठी रवींद्र भवन बांधायचे आहे. केवळ जागेअभावी सगळे अडले आहे, असे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे उत्तरादाखल बोलताना म्हणाले.यावेळी आमदार हळर्णकर यांनी तुम्ही पेडे येथेच रवींद्र भवन बांधा, असे सांगितले. कारण म्हापसा शहरात अगोदरच वाहनांची प्रचंड गर्दी झालेली आहे. शहरात वाहतुकीच्या मोठ्या समस्या आहेत. शहराबाहेर रवींद्र भवन असणे चांगले, असे हळर्णकर म्हणाले.मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यावेळी बोडगेश्वर मंदिर परिसरात रवींद्र भवन व्हावे म्हणून सरकारने प्रयत्न केल्याचे सांगितले. ती जागादेखील शहराच्या बाहेरच येते. बोडगेश्वर मंदिर परिसरातील जमिनीसाठी सुमारे एक हजार कुळे आहेत. त्या सर्वाशी बैठका सुरू असून आता लवकरच त्या सगळ्या कुळांकडून सरकारला ना हरकत दाखला मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.आपण स्वत: गंभीरपणे या विषयात लक्ष घालतो व रवींद्र भवनासाठी जागा निश्चित करतो. पेडण्यामध्ये मंत्री बाबू आजगावकर यांनी जागा दाखवली व त्यामुळे तिथे रवींद्र भवन होत आहे. पेडे येथे देखील रवींद्र भवन बांधता येईल. प्रसंगी जागा विकत घेण्याची सरकारची तयारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
रवींद्र भवनासाठी म्हापशात लवकरच जागा निश्चित करू- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 5:19 PM