पणजी : फेरीबोट भाड्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी जनतेच्या भावनांचा विचार केला जाईल, असे नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. लोकांची इच्छा नसेल तर सरकार त्यानुसार निर्णय घेईल. गरज पडल्यास मुख्यमंत्री हस्तक्षेप करतील, असे ते म्हणाले. फेरीबोट प्रवासासाठी दुचाक्यांना तिकीट लागू करण्याबरोबरच चारचाकींसाठी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्याने लोकांमध्ये संतप्त भावना आहे त्या पार्श्वभूमीवर खात्याचे मंत्री फळदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले की, ' या प्रश्नावर आम्ही आमदार आणि स्थानिक नेत्यांशीही बोलू. पण माझे असे प्रामाणिक मत आहे की, त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला पाहिजे.फळदेसाई पुढे म्हणाले की, दुचाकींसाठी तिकीट सुरू करणे आणि चारचाकी वाहनांसाठी फेरीबोट प्रवासभाडे वाढवणे यामागचा उद्देश महसूल गळती रोखणणे व डिजिटायझेशन करून महसूल मिळवणे हा आहे. ते म्हणाले की, मोफत फेरी सेवा देण्यासाठी सरकार वर्षाकाठी ४५ ते ५० कोटी रुपये खर्च करत आहे. तिकीट व पासेस च्या माध्यमातून वर्षासाठी चार ते पाच कोटी रुपये मिळाले तरीजुन्या फेरीबोटी मोडीत काढून हा महसूल अत्याधुनिक नवीन फेरीबोटी खरेदी करण्यासाठी वापरता येईल.पास घेण्याची आणि नूतनीकरणाची तसेच दैनंदिन तिकीट काढण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली जाणार आहे कारण यापूर्वी तिकीट कलेक्टरनी केलेला घोटाळा व त्यांच्या वरील कारवाई सर्वश्रुत आहे. कोणत्याही परिस्थितीत महसूल गळती रोखली जाईल.
फेरीबोटी पाण्यावर चालतात का?, हॉटेलात चहासाठी गेलात तर सहाशे रुपये खर्च करत नाही का?- फळदेसाईंचा सवाल
फेरीबोटींसाठी इंधन तसेच इतर गोष्टींवर खर्च करावा लागतो त्या पाण्यावर चालतात का?, असा सवाल करून फळदेसाई म्हणाले की, हॉटेलात चहा पिण्यासाठी मित्रांबरोबर गेलात तरी तरी सहाशे रुपये खर्च होतात. त्यामुळे तिकीट भाड्यावर गळा काढणे योग्य नव्हे. दुचाकींसाठी महिन्याचा १५० रुपयांचा पास काढला तरी प्रति ट्रिप ५ रुपये आणि चार चाकींसाठी सहाशे रुपयांचा पास काढला तरीप्रति ट्रीप १० रुपये खर्च येईल. हे सहज परवडण्यासारखे आहे.