नारायण गवस
पणजी : समाज कल्याण खात्यांतर्गत सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा आता जानेवारीपासून पुन्हा सुरु होणार आहे. देवदर्शन यात्रेसाठी राज्य भरातील ६० वर्षावरील अनेक नागरिकांनी अर्ज केले आहेत. हे सर्वजण देवदर्शन यात्रेच्या प्रतिक्षेत आहेत. आतापर्यंत ११ हजार ९७९ जणांनी याचा लाभ घेतला आहे. मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा भाविकांना तिरुपती, शिर्डी, वेलंकणी अशा तिर्थक्षेत्रावर रेल्वेन घेऊन गेले जाते. या प्रवासात त्यांना सर्व मोफत दिले जाते. अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला आहे.
या यात्रेसाठी ७ नोव्हेबर २०२२ रोजी पहिली रेल्वे लोकांना घेऊन गेली होती. तर शेवटची रेल्वे २ मार्च २०२३ ला भाविकांना घेउन गेली होती. आता गेले ९ महिने झाले अजून पुन्हा सुरु झालेली नाही. यासाठी राज्यभरातून हजारो लोकांनी अर्ज केले आहेत. या अर्जाची समाज कल्याण खात्याकडून छाननी केली आहे. ६० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्टांसाठी ही योजना असून सर्व आमदारांनी आपल्या मतदार संघातील नागरिकांना हे अर्ज दिले आहेत. या अर्जामध्ये लाभार्थ्यांनी आपला फोटो तसेच आधार कार्ड रहिवासी दाखला तसेच इतर माहिती समाज कल्याण खात्याकडे पाठविणे गरजेचे आहे. अनेक लोक या अर्जांची वाट पाहत आहेत.
या योजने विषयी लवकरच समाज कल्याण मंत्र्याशी बैठक होणार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे ही योजना सुरु करण्यास काही काळ विलंब लागला होता. पण ज्या लोकांनी अर्ज केले आहेत त्यांना लवकरच याचा लाभा घेता येणार आहे, असे समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांनी सांगितले.