पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सत्ताधारी आघाडीमध्ये सुसंवाद राहावा तसेच सर्वच मंत्री संघटित राहावेत म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. विविध मंत्र्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन सुसंवाद प्रस्थापित करण्याचा कार्यक्रम पर्रीकर यांनी प्रथमच हाती घेतला आहे. शनिवारी पर्रीकर यांनी शिवोलीचे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे मंत्री विनोद पालयेकर आणि साळगावचे आमदार तथा मंत्री जयेश साळगावकर यांचे घर गाठले व त्यांच्या कुटुंबीयांशीही गप्पा केल्या.२०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच अनेक धडे दिलेले आहेत. निवडणुकीवेळी भाजपविरुद्ध गोवा फॉरवर्ड तसेच भाजपविरुद्ध काही अपक्ष उमेदवार तसेच अपक्ष आमदार आणि भाजपविरुद्ध मगोप असा सामना झाला. सर्वांनी एकमेकांविरुद्ध कडवट टीका केली होती. मात्र, आता सर्व संभ्रम आणि शंका-कुशंका दूर होऊन आघाडी सरकार अधिकारावर आलेले असल्याने सगळी कटुता नष्ट व्हायला हवी आणि सरकारही टीकायला हवे, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांना वाटते. भाजपलाही तसेच वाटत आहे. त्यामुळे पर्रीकर यांनी मंत्र्यांच्या घरी भेट देण्याची मोहीमच हाती घेतली आहे. पर्रीकर एरव्ही ठरावीक आमदारांच्या घरी फक्त चतुर्र्थीवेळी जात होते. मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या घरी तर प्रत्येक चतुर्थीवेळी पर्रीकर जाऊन दुपारी तिथे जेवणही घेत होते. मात्र, या वेळी पर्रीकर यांनी खाते वाटपापूर्वी बहुतांश मंत्र्यांच्या घरी भेटी देणे योग्य समजले आहे. शनिवारी मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनाही पर्रीकर यांनी आपण घरी येत असल्याचा निरोप दिला होता. मात्र, नंतर पर्रीकर यांना तातडीचे काम आल्याने ते डिसोझा यांच्या घरी पोहचू शकले नाहीत. सोमवारी पर्रीकर डिसोझा तसेच अपक्ष मंत्री खंवटे यांच्या घरी जाणार आहेत. शनिवारी पर्रीकर यांनी मंत्री पालयेकर यांच्या निवासस्थानी जाऊन दुपारी जेवणही घेतले. (खास प्रतिनिधी)
मुख्यमंत्री मंत्र्यांच्या दारी
By admin | Published: March 19, 2017 2:08 AM