नारायण गावस
पणजी : मागील २४ दिवस पणजीतील आझाद मैदानावर आंदाेलन करणाऱ्या कदंब कर्मचाऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी बुधवारी ६ मार्च राेजी साेडविण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे न घेता ६ मार्चपर्यंत आंदोलन सुरुच ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांनी मागण्यांचा करार मंजूर केल्यावर हे आंदोलन मागे घेतले जाणार आहे. जर मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाहीतर हे आंदोलन आणखी तीव्र केले जाणार असा इशारा या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेऊन दिला.
कामगार नेते ॲड. सुहास नाईक म्हणाले, कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी ६ मार्चला मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो.
ॲड नाईक म्हणाले, नव्या २५० बसेस आणून राज्यातील सगळ्या गावांत बससेवा चालू करणे, भविष्य निर्वाह निधीची पुनर्स्थापना करणे, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी ताबडतोब देणे, समान काम समान पगाराच्या आधारावर बदली कामगारांना कायम करणे, इलेक्ट्रिक बसेस कदंब व्यवस्थापनाने चालवल्या पाहिजेत आणि त्यांची देखभाल, दुरुस्ती स्वतः करावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
ॲड. राजू मंगेशकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांवर आम्हाला विश्वास आहे ते नक्कीच कामगारांना न्याय देणार आहे. त्यामुळे हे केले २४ दिवस आंदोलन करणाऱ्या कामगारांना कुठेतरी न्याय मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी कामगारांची दखल घ्यावी यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत असेही मंगेशकर म्हणाले.