पणजी : विधानसभा अधिवेशन काळात ड्युटीवरील पोलिसांना जेवण देण्याचे बंद करण्यात आल्याने राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी मुख्य सचिव, तसेच पोलीस महासंचालकांना नोटिसा बजावल्या आहेत. समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी याबाबत आयोगाकडे तक्रार केली होती. मुख्य सचिव आणि डीजीपींनी २८ रोजी सकाळी ११ वाजता आयोगासमोर हजेरी लावून किंवा वकिलांमार्फत आपले म्हणणे मांडावे, असे बजावण्यात आले आहे. ड्युटीवरील पोलिसांप्रती ही अमानवी वागणूक असल्याचे आयरिश यांनी तक्रारीत म्हटले होते. या आधी प्रत्येक विधानसभा अधिवेशनाच्यावेळी पोलिसांना जेवणाची पाकिटे दिली जात असत. या वर्षी ती अचानक बंद करण्यात आल्याने पोलिसांचे हाल झाले आहेत. त्यांना घरातून बाहेर पडताना स्वत:चे जेवण आणावे लागत आहे. विधानसभा संकुलाच्या आवारात बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात असतात. यात महिला पोलिसांचाही समावेश असतो. त्यांना नैसर्गिक विधींसाठीही मुताऱ्यांची व्यवस्था नाही. अधिवेशन काळात रोज १0 तासांपेक्षा अधिक काम हे पोलीस करतात, त्यामुळे त्यांना आवश्यक त्या सुविधा देणे आवश्यक आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अमानवी असून मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे आयरिश यांनी तक्रारीत म्हटले होते. (प्रतिनिधी)
मुख्य सचिव, डीजीपींना नोटिसा
By admin | Published: July 28, 2015 2:11 AM