लोकमत न्यूज नेटवर्क खांडोळा : राज्य सरकार इको, साहस, क्रीडा आदी क्षेत्रांसह पर्यटनाच्या नवनव्या कक्षांचा प्रसार करीत असून, आध्यात्मिक पर्यटनासह राज्यातील सांस्कृतिक ठेवा जपून ठेवण्याच्या हेतूने माशेलमधील चिखलकाला राज्य स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
पर्यटन खात्यातर्फे आयोजित तीन दिवसांच्या चिखलकाल्याचा शुभारंभ केल्यानंतर माशेलच्या देवकीकृष्ण मंदिर आवारात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पर्यटन संचालक सुनील आंचिपाका, मंदिर समिती अध्यक्ष गिरीश धारवाडकर, किशोर भगत उपस्थित होते.
शिगमो आणि कार्निव्हलव्यतिरिक्त गोव्यात कितीतरी आगळेवेगळे उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. मात्र, त्याकडे पर्यटनाच्या नजरेने लक्ष दिले जात नव्हते. ही कसर भरून काढताना राज्यातील सांजाव आणि चिखलकाला या गोव्यातील पारंपरिक उत्सवांची पर्यटकांना ओळख करून देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतल्याचे खंवटे गांनी सांगितले.
माशेलमधील चिखलकाला यंदा तीन दिवसांचा होत असून, दिग्गज कलाकारांच्या कला सादरीकरणाने इथला माहोल खरोखरच भक्तीमय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्थानिकांसोबत इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी चिखलकाला वेगळीच पर्वणी ठरेल, असेही ते म्हणाले. माशेल येथील श्री देवकी कृष्ण मंदिर आवारात ३० जूनपर्यंत चिखलकाल्यानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
शुभारंभानंतर संध्याकाळी देवानंद मालवणकर आणि प्रियांका रायकर यांच्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर झाला. एकापेक्षा एक अशा सरस भक्तिगीतांनी त्यांनी रसिकांना मुग्ध केले. तद्नंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने रसिक श्रोतावर्ग तृप्त झाला. रात्री ८ वाजता भक्तिसंगीताचा भक्तिरंग कार्यक्रम होणार आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
कला व संस्कृती मंत्री गावडे यांनीही यावेळी आपले विचार मांडले. पर्यटन विस्ताराच्या वृद्धीसाठी पर्यटन खात्याकडून होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. संचालक आंचिपाका यांनी स्वागतपर विचार मांडले. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले.