लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सरकारमधील दोन मंत्री एकीकडे माशेलच्या चिखलकाल्यात दंग झाले असताना दुसरीकडे मंत्रिमंडळ फेरचनेच्या चर्चेला पुन्हा एकदा ऊत आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यापाठोपाठ जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकरही काल दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री रात्री आठनंतर गोव्यात परतले. मात्र सभापती रमेश तवडकर यांना पुढील दोन महिन्यांत मंत्रिपद मिळू शकते, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे.
माशेलचा चिखलकाला यंदा प्रथमच राज्यस्तरावर साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यासाठी गेले तीन दिवस पर्यटन खात्याने इव्हेंट आयोजित केले होते. काल चिखलकाल्यात स्वत: पर्यटनमंत्री रोहन खंवटे व स्थानिक आमदार तथा कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे सहभागी झाले. एवढ्यावरच न थांबता या दोन्ही मंत्र्यांनी चिखलकाल्याच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होऊन ते खेळलेही. सोशल मीडियावर मात्र हा विषय चर्चेचा ठरला. खंवटे हा कार्यक्रम आटोपून लगेच गोव्याबाहेर रवाना झाले. चिखलकाल्याचा उत्सव चांगला आहे; पण अधिकाधिक मंत्री जर चिखलकाला खेळू लागले तर त्याला राजकीय रंग येईल, अशी प्रतिक्रिया काहीजण व्यक्त करू लागले आहेत.
दुसरीकडे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत सहाव्या फिट इंडिया मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी म्हणून काल सकाळीच दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
गेल्या सप्टेंबरमध्ये आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, केदार नाईक, डिलायला लोबो व रुडॉल्फ फर्नांडिस हे आठ कॉंग्रेस आमदार फुटले आणि त्यांनी विधिमंडळ गटच भाजपमध्ये विलीन केला. त्यावेळी आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते; परंतु अजून काही त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही. दिगंबर कामत हेही आपले घोडे पुढे दामटत आहेत. फुटिरांपैकी काही आमदार नाराज आहेत. संकल्प आमोणकर यांनी अजून बालभवनच्या अध्यक्षपदाचा ताबा घेतलेला नाही.
दरम्यान, सूत्रांकडून माहिती मिळते की, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ फेररचना चालू महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच गोव्यातही फेरबदल होतील. येत्या ८ ते १० जुलैपर्यंत हे फेरबदल करण्याचे केंद्रीय नेत्यांनी ठरवले आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातही काही फेरबदल होतील.
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ फेररचना जुलैच्या पहिल्याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच गोव्यातही फेरबदल होतील. जुलैमध्ये बदल करण्याचे केंद्रीय नेत्यांनी ठरवले असून त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातही बदलाची चर्चा आहे.
चतुर्थीपूर्वी कोणतेही बदल नाहीत : तानावडे
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी तूर्त मंत्रिमंडळ फेररचनेची शक्यता पुन्हा एकदा फेटाळून लावली. ते म्हणाले की, 'चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत. मुख्यमंत्री दिल्लीला एका कार्यक्रमानिमित गेलेले आहेत. त्यांच्या दिल्ली भेटीचा चुकीचा अर्थ लावू नये.
शिरोडकरही दिल्लीत
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनीही काल दिल्लीला धाव घेतली. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना आणखीनच ऊत आला; परंतु शिरोडकर हे त्यांच्या खात्याशी निगडित कामांसाठी दिल्लीला गेल्याचे नंतर स्पष्ट झाले. मंत्रिमंडळ फेररचनेत एका दोघा मंत्र्यांना जरी वगळले तरी त्यावरून पुन्हा असंतोष पसरण्याची शक्यता आहे. कोणाला वगळणार? यावरूनही तर्क लढवले जात आहेत.