पणजी (नारायण गावस ): मुलांनाही लोकशाही कळावी तसेच भविष्यात एक उत्कृष्ट नागरिक व्हावे यासाठी गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पंचायत तसेच नगरपालिकांमध्ये बालसभेसाठी 'मार्गदर्शक दस्तऐवज' जारी केला आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायती आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये बालसभा आयोजित करण्यासाठी एक सर्वसमावेशक पुस्तिका म्हणून काम करेल. या सभामार्फत मुलांचे आवाज ऐकले जातील आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कृती केली जाईल.
बालहक्क आयोगाने म्हटले आहे की, भविष्यात एक जबाबदार नागरिक तयार करण्यासाठी गाव पातळीवर बाल संरक्षण आकार मजबूत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक पंचायत आणि नगरपालिकेने बाल ग्रामसभा आयोजित केल्यापासून ३० दिवसांच्या आत, कार्यवाही आणि परिणामांचा तपशीलवार अनुपालन अहवाल सादर करावा, असा आदेशही आयोगाने दिला आहे.
ही बालसभा फक़्त केवळ मुलांचे ऐकण्यासाठीच नाही तर त्यांना निर्णय प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेईल, असे त्यात म्हटले आहे. बालहक्क आयोगाने पंचायतींच्या संचालकांना आणि नगरपालिका प्रशासनाला दर वर्षी किमान दोन बाल ग्रामसभा आयोजित करण्याच्या विनंतीसह सर्व पंचायती आणि नगरपालिकांना दस्तऐवज प्रसारित करण्यास सांगितले आहे.
देशभर बालसभा आशेचा किरण म्हणून उभ्या राहत आहेत. प्रत्येक मुलाचे मत आपल्या समाजाच्या संरचनेचा महत्वाचे आहे. जगण्याचे, विकासाचे, संरक्षणाचे आणि सहभागाचे मूलभूत अधिकार कळायला हवे. आम्ही अशा समाजाचा पाया रचत आहोत जो केवळ आपल्या मुलांचे ऐकतोच असे नाही तर त्यांच्या विचारांचा आदर करतो आणि त्यावर कार्य करतो असेही बालहक्क आयोगाने म्हटले आहे.