लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून शरद ऋतू लागल्यानंतर सूर्याच्या किरणांची तीव्रता (प्रखरता) वाढते. त्यामुळे विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. दुपारी सूर्याच्या किरणांपासून शक्त तेवढे दूर राहणे लाभदायक ठरेल. शरदऋतूमध्ये माणसाच्या शरीरातील पित्ताचा प्रकोप वाढत असल्याने या काळात संसर्ग होऊन विविध प्रकारचे आजार होऊ शकतात, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करतात.
ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विविध भागांत सकाळ-दुपारच्या वेळी सर्वांत जास्त असा कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोचू शकतो. त्यामुळे या कालावधीत माणसाच्या शरीरातील पित्ताचा प्रकोप वाढतो अशावेळी या कालावधीत चण्याचे पीठ, राजमा, उडीद डाळ, थंड पदार्थ, बटाटे आणि बटाट्याचे विविध पदार्थ, मांसाहारी जेवण, दही इत्यादी पित्त वाढवणारे खाद्यपदार्थ टाळणे अनेकदा फायद्याचे ठरते.
लहान मुले, वृद्धांना धोका
शरीरात पित्ताचा प्रकोप वाढल्यानंतर सर्दी-ताप, खोकला इत्यादी संसर्गजनक आजार होण्याची शक्यता निर्माण होते. अशा प्रकारचे संसर्गजनक आजार लहान मुले आणि वृद्धांना अधिक प्रमाणात आढळून येतात.
कोणत्या आजारांचा धोका?
सर्दी : वर्षा ऋतूत माणसाच्या शरीरात पित्ताचे संचय (जमा होणे) व्हायला सुरुवात होते. मध्य सप्टेंबरमध्ये शरद ऋतू लागल्यानंतर माणसाच्या शरीरातील पित्ताचा प्रकोप वाढतो. त्यामुळे अनेक लोकांना संसर्गजनक आजारांचे प्रमाण वाढते. या काळात अनेकांना सर्दीचा त्रास होताना दिसून येतो.
ताप : या काळात अनेक लोकांना ताप येणे, खोकला सुरु होणे अशा प्रकारचे त्रास होताना दिसून येतात. ज्यांना अशा प्रकारची समस्या निर्माण होते, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषध घ्यावे.
नाक वाहणे : अनेकांना या काळात सर्दी, खोकला होण्याबरोबरच नाक वाहणे यांसारख्या समस्येमुळे त्रस्त व्हावे लागते.
मध्य सप्टेंबर ते मध्य ऑक्टोबर अशा कालावधीत शरद ऋतू लागत असून या कालावधीत माणसाच्या शरीरातील पित्ताचा प्रकोप वाढतो. त्यामुळे या काळात संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कालावधीत आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी पित्त-वायू शरीरात वाढणार नाही, अशा प्रकारच्या खाद्यपदार्थाचे सेवन केल्यास फायदेशीर ठरते. फायदेशीर ठरेल. पित्त वाढवणारे खाद्यपदार्थ टाळल्यास - डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, आयुर्वेदिक चिकित्सक, मुरगाव