लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : अनुकंपा तत्त्वावर ७१ जणांना व स्वातंत्र्य सैनिकांच्या २८ मुलांना वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. संबंधित खात्यांच्या माध्यमातून या सर्वांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.
सरकारी सेवेत असताना मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या जवळच्या नातलगास सरकारी खात्यामध्ये नोकरी दिली जाते. त्यासाठी पूर्वी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये, अशी अट होती. ही उत्पन्न मर्यादा वाढवून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे एवढी वर्षे उत्पन्न मर्यादमुळे अडकलेले अर्जही निकालात काढणे शक्य झाले.
याबाबत, कार्मिक खात्याचे संयुक्त सचिव परेश फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'अपघातात मृत्यू पावलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नातलगांना अनुकंपा बाबतीत प्राधान्य दिले आहे. अशी तीन ते चार प्रकरणे आहेत.' दरम्यान, दुसरीकडे स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचीही नोकऱ्यांची मागणी होती. अशा २८ जणांनाही वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये नोकरीची नियुक्तीपत्रे पाठवण्यात आली आहेत.