पणजी : स्वातंत्र्यसैनिकांची काही मुले अजूनही सरकारी नोकय्रांपासून वंचित आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या वर्षी क्रांतिदिनी रोजी ऑक्टोबरपर्यंत स्वातंत्र्यसैनिकांची सर्व मुलांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता झालेली नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केली. आझाद मैदानावर गोवा क्रांती दिनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना युरी म्हणाले की,‘ अजूनही स्वातंत्र्यसैनिकांच्या काही मुलांना नोकय्रा मिळालेल्या नाहीत. त्यांना सरकारने न्याय द्यायला हवा.’
‘ज्युलियांव मिनेझिस यांच्या नावाने विद्यापीठात अध्यासन स्थापन करा’दरम्यान, क्रांती लढ्यासाठी डॉ. राम मनोहर लोहिया यांना गोव्यात आमंत्रित करण्यासाठी पुढाकार घेतलेले डॉ. ज्युलियांव मिनेझिस यांच्या नावाने गोवा विद्यापीठात अध्यासन स्थापन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी केली आहे. डॉ. लोहिया यांनी १८ जून १९४६ रोजी मडगाव येथून गोवा क्रांती लढ्याची सुरूवात केली. त्यामुळे सरकारने गोवा क्रांतीदिनाचा शासकीय कार्यक्रम मडगांवच्या लोहिया मैदानावरच आयोजित करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
युरी पुढे म्हणाले की,‘ सरकारने मडगांवचे ऐतिहासिक लोहिया मैदान, पणजीचे आझाद मैदान, असोळणा आणि पत्रादेवी येथिल हुतात्मा स्मारक तसेच गोवा क्रांती चळवळ आणि गोवा मुक्तिलढ्याशी संबंधित इतर स्मारकांना ‘ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे’ म्हणून अधिसूचित करावे अशी मागणी मी विधानसभेत सातत्याने करीत आलो आहे. परंतु अद्याप काहीही होऊ शकलेले नाही.’ युरी यांनी सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर आदरांजली वाहिली.