ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 12 - गोव्यात साकारणा-या इलेक्ट्रॉनिक सिटी व आयटी पार्क प्रकल्पांमध्ये चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी रस दाखविला आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.गोवा भेटीवर आलेल्या वांग यी यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री पार्सेकर यांची भेट घेतली व अनेक विषयांबाबत चर्चा केली. तुयें येथे इलेक्ट्रॉनिक सिटी उभी राहणार आहे तर चिंबल येथे आयटी पार्क साकारणार आहे. चीनमधून गोव्याच्या आयटी क्षेत्रत गुंतवणूक होऊ शकते, असे संकेत मुख्यमंत्री पार्सेकर व वांग यी यांच्या भेटीतून मिळाले.येत्या ऑक्टोबरमध्ये गोव्यात ब्रीक्स परिषद होणार आहे. त्यानिमित्ताने चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आले होते. ब्रीक्स परिषदेसाठी केंद्र सरकारने गोव्याची निवड केली ही अभिमानाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. इलेक्ट्रॉनिक सीटीमध्ये गुंतवणुकीसाठी वाव आहे. ब्रीक्स परिषदेनंतर गुंतवणुकीबाबत स्पष्टता येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही गोव्याच्या आयटी क्षेत्रत चिनमधील गुंतवणुकीचे स्वागत करू. ब्रीक्ससाठीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी वांग यी आले होते, असे पार्सेकर यांनी सांगितले. चीनचे राष्ट्राध्यक्ष ब्रीक्स परिषदेत भाग घेणार आहेत. त्यामुळे वांग यी यांनी गोव्यात येऊन सुरक्षेच्यादृष्टीने व अन्य तयारीच्या दृष्टीने पाहणी केली.
चीनला गोव्यातील आयटी प्रकल्पांमध्ये रस
By admin | Published: August 12, 2016 8:45 PM