पणजी : गोव्यात स्वर्गीय जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभा करायला हवा, अशा प्रकारच्या मागणीने जोर धरल्यानंतर व त्या मागणीला छुप्या पद्धतीने काही आमदार व मंत्र्यांकडून विरोधही होऊ लागल्यानंतर हा विषय 51 वर्षानंतर आता गोव्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रत अस्वस्थता निर्माण करू लागला आहे. पुतळ्य़ाच्या वादाने पुन्हा एकदा ख्रिस्ती राजकारणाला गोव्याच्या केंद्रस्थानी आणले जात असल्याची भावना काही घटकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे.
गोवा मुक्तीनंतर स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांना हिंदू बहुजन समाजाचा नेता मानले गेले. बांदोडकर यांच्या निधनानंतर अजुनही गेल्या 45 वर्षात ती जागा कुठचाच दुसरा नेता घेऊ शकला नाही. बहुजन समाजात बांदोडकर यांची लोकप्रियता एवढी प्रचंड होती की, 1967 साली जनमत कौल हरल्यानंतर देखील पुन्हा विधानसभा निवडणुकीत स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचा व त्यांच्या मगो पक्षाचाच विजय झाला. बांदोडकर हे मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या स्वर्गीय शशिकला काकोडकर यांनी गोव्याला नेतृत्व दिले. गोवा मुक्तीनंतर सलग 17 वर्षे हिंदूंचा पक्ष म्हणून ओळखल्या गेलेल्या मगोकडेच सत्ता राहिली.
बांदोडकरांच्या काळात स्व. जॅक सिक्वेरा हे विरोधी पक्षनेते होते पण सिक्वेरा हे केवळ ख्रिस्ती मतदारांचे नेते अशीच प्रतिमा कायम राहिली. युनायटेड गोवन्स पक्षाचे नेतृत्व सिक्वेरा करत होते. गोमंतकीय मतदारांनी कधीच सिक्वेरा किंवा अन्य खिस्ती धर्मिय नेत्यांकडे सत्ता सोपवली नाही. 1980 सालापासून गोव्यात काँग्रेसची राजवट सुरू झाली आणि सासष्टी तालुक्यातील ख्रिस्ती धर्मिय राजकारण गोव्याच्या केंद्रस्थानी आले. कधी काँग्रेसमध्ये फुट पडून वेगळे गट निर्माण झाले तर कधी मगो पक्षात फुट पडून मगोतील गट जाऊन काँग्रेसला मिळाले. 80 सालापासून 2000 सालार्पयत म्हणजे दोन दशके काँग्रेसने किंवा काँग्रेसशी वैचारिकदृष्टय़ा जुळणा:या गटांनी गोव्यावर राज्य केले. याच काळात स्वर्गीय विल्फ्रेड डिसोझा, स्व. लुईस प्रोत बाबरेझा, चर्चिल आलेमाव, लुईङिान फालेरो, फ्रान्सिस सार्दिन असे काही नेते थोडय़ा काळासाठी मुख्यमंत्री झाले. साधारणत: वीस वर्षापैकी पंधरा वर्षे सासष्टीच्या नेत्यांनी राजकारणावर प्रभाव ठेवला. 2क्क्क् सालापासून भाजपची राजवट सुरू झाली. त्यानंतर सासष्टीतील ख्रिस्ती धर्मिय राजकारण थोडे मागे पडले. 2007 साली पुन्हा काँग्रेसचे सरकार आले व त्यावेळी सासष्टीतील हिंदू नेते दिगंबर कामत हे मुख्यमंत्री बनले.
मात्र सासष्टीतील राजकारण केंद्रस्थानी आले नव्हते. आता मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रीपदी असले व भाजपप्रणीत आघाडी सरकार अधिकारावर असले तरी, गोवा फॉरवर्ड पक्षाने ख्रिस्ती मतदारांना आकर्षित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ख्रिस्ती समाजाचे नेते स्व. ज्ॉक सिक्वेरा यांच्यामुळेच गोव्यात महाराष्ट्राचे विलीनीकरण होऊ शकले नाही असा प्रचार गोवा फॉरवर्डचे नेते मंत्री विजय सरदेसाई यांनी सुरू केला आहे. सिक्वेरा यांचा पुतळा उभारावा अशी मागणी सरदेसाई यांनी सुरू करून सरकारवर दबाव चालविला आहे. सासष्टीतील ख्रिस्ती मतदारांना चुचकारणो हा यामागिल हेतू भाजपाने ओळखला आहे. भाजपचे आमदार मायकल लोबो यांनीही मंत्री सरदेसाई यांना साथ दिली आहे. भाजपने अजून याविषयाबाबत कोणतीच ठाम भूमिका घेतलेली नाही. तथापि, आयुष्यभर ख्रिस्ती धर्मियांचेच राजकारण केलेल्या सिक्वेरा यांचा पुतळा आम्ही का उभा करावा असा विचार भाजपामधील एक गट करू लागला आहे. मंत्री सरदेसाई यांनी आपल्या मागणीच्या समर्थनार्थ मडगावमध्ये मंगळवारी सभाही घेतली.
ख्रिस्ती मतदार हे कायम काँग्रेससोबत राहिले आहेत. काँग्रेसचे नेते रवी नाईक यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष हा ख्रिस्ती मतदारांमध्ये विभाजन करून काँग्रेसला हानी पोहचवू पाहत आहे, अशी शक्यता व्यक्त केली आहे. काँग्रेसनेही ज्ॉक सिक्वेरा यांचा पुतळा उभारावा या मागणीला पाठींबा देण्याचे धोरण स्वीकारले आहे. काँग्रेस पक्ष अनेक वर्षे सत्तेत असताना मात्र सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभेसमोर किंवा सचिवालयासमोर उभा केला गेला नाही.